IND vs ENG : श्रेयस अय्यर कॅप्टनशिपच्या बाबतीत सुरुवातीलाच दोन गोष्टींमध्ये कमनशिबी ठरला, अन्यथा त्याची स्टार्ट सुद्धा चांगली झाली असती
IND vs ENG : सूर्यकुमार यादव आऊट ऑफ फॉर्म होता म्हणून त्याच्याजागी श्रेयसला कॅप्टन केलं. पण श्रेयसच्या नेतृत्वाखाली टीमला पहिला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. दोन बाबतीत श्रेयस अय्यर कमनशिबी ठरला. अन्यथा त्याची सुरुवात सुद्धा चांगली होऊ शकली असती

सध्या टीम इंडियाचा संघर्ष सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम हीच का? असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आयर्लंड त्यानंतर आता इंग्लंडमध्येही टीम इंडिया पहिल्या विजयासाठी आसुसली आहे. आयपीएल 2026 सीजन गाजवणारे वैभव सूर्यवंशी आणि श्रेयस अय्यर हे दोघेही या टीममध्ये आहे. श्रेयस अय्यर आधी टीम इंडियाच्या टी 20 संघाचा भाग नव्हता. पण आयपीएलमधील यंदाच्या आणि मागच्या सीजनमधील कामगिरी पाहून त्याला टीम इंडियाचं कॅप्टन बनवण्यात आलं. पण श्रेयस अय्यर कॅप्टन बनल्यानंतर अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. या दोन्ही देशांचा दौरा सुरु होण्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना असं वाटलेलं की, आयर्लंडचा पेपर सोपा असेल. आयर्लंड सारख्या दुबळ्या टीमवर भारतीय क्रिकेट संघ सहज विजय मिळवेल. पण हा अंदाज चुकला. आयर्लंडकडून दोन्ही टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला आणि टीम इंडियाने ही सीरीज 2-0 अशी गमावली. खरंतर आयर्लंडच्या तुलनेत भारतीय संघाकडे टी20 चा जास्त अनुभव आहे.
आयर्लंडकडून हरल्यानंतर असं वाटलेलं की, इंग्लंडमध्ये तरी टीम इंडिया चांगली सुरुवात करेल. पण पहिला सामना पावसामुळे ड्रॉ झाला. त्यानंतर दुसऱ्या टी20 सामन्यात 190 अशी चांगली टोटल उभारुनही टीम इंडियाचा चार विकेटने पराभव झाला. इंग्लंडने हे लक्ष्य सहज पार केलं. तिसऱ्या टी20 सामन्यात कामगिरी सुधारण्याऐवजी अजून ढेपाळली. इंग्लंडने पहिली फलंदाजी करताना 7 बाद 201 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव 76 धावात आटोपला. इंग्लंडने तब्बल 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दारुण, लाजिरवाणा हे शब्द सुद्धा या पराभवाचं वर्णन करायला अपुरे आहेत.
श्रेयस कशामध्ये कमनशिबी ठरला?
सूर्यकुमार यादव आऊट ऑफ फॉर्म होता म्हणून त्याच्याजागी श्रेयसला कॅप्टन केलं. पण श्रेयसच्या नेतृत्वाखाली टीमला पहिला विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. दोन बाबतीत श्रेयस अय्यर कमनशिबी ठरला. अन्यथा त्याची सुरुवात सुद्धा चांगली होऊ शकली असती. एक म्हणजे टी20 वर्ल्ड कप, आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया थेट आयर्लंड, इंग्लंड टूरवर गेली आहे. भारतीय खेळाडू पाटा खेळपट्ट्यांवर खेळून तिथे गेले आहेत. आयर्लंड आणि इंग्लंडमधील वातावरण खूप वेगळं असतं. तिथे हवामान महत्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे खेळाडूंनी त्या वातावरणाशी जुळवून घेणं आवश्यक असतं. भारतातील खेळपट्ट्या फिरकीला पोषक असता. इथे धावांचा पाऊस पडतो. पण तेच आयर्लंड, इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होतो. खेळपट्टी फलंदाज, गोलंदाज दोघांना अनुकूल असते. त्यामुळे अशा पीचेसवर खेळणं सोपं नाहीय.
या दोन गोष्टी आज श्रेयसच्या बाजूने नाहीत
दुसरी गोष्ट अशी की, श्रेयसच्या संघात टीम इंडियाचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराह नाहीय. जसप्रीत बुमराहच्या चार ओव्हरमध्ये नुसत्या धावांनाच ब्रेक लागत नाही, तर विकेटही मिळतात. बुमराहची खासियत म्हणजे भेदक यॉर्कर आणि गरज असताना विकेट काढून देणं. आज श्रेयस अय्यरकडे अशा गोलंदाजाची कमतरता आहे. या दोन बाबतीत श्रेयस कमनशिबी ठरला, नाही तर त्याच्या कॅप्टनशिपची सुद्धा चांगली सुरुवात झाली असती.