IND vs SA : दारुण पराभव, रोहितला सहनच झालं नाही, दोघांना मैदानातच सुनावलं

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. त्यामुळे मालिकेत आफ्रिकेच्या टीमने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रोहित शर्माला या सामन्या दरम्यान काही गोष्टी पटल्या नाहीत. त्याने मैदानाताच त्या बद्दल नाराजी व्यक्त केली.

IND vs SA : दारुण पराभव, रोहितला सहनच झालं नाही, दोघांना मैदानातच सुनावलं
Rohit Sharma
Updated on: Dec 04, 2025 | 9:20 AM

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचा काल दारुण पराभव झाला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 359 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या विजयाची शक्यता जास्त वाटत होती. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सामना फिरवला. दुसरी वनडे जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दक्षिण आफ्रिकेची टीम जिंकू शकली, याला कारण होतं भारताची सुमार गोलंदाजी. टीम इंडियाच्या बॉलर्सनी इतकी वाईट, दिशाहीन गोलंदाजी केली की, दक्षिण आफ्रिकेने सामना सहजतेने जिंकला. गोलंदाजीची ही तऱ्हा पाहून टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माला स्वत:वर संयम ठेवता आला नाही. त्याने गोलंदाजी करायला चाललेल्या प्रसिद्ध कृष्णाला मैदानातच थांबवलं आणि हर्षित राणाला सुद्धा बोलावलं.

रोहितने या दोन्ही युवा गोलंदाजांना मैदानातच सुनावलं. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सहज चौकार वसूल करण्यापासून कसं रोखायचं? यावर दोघांशी चर्चा केली. त्यांना कानमंत्र दिला. यावेळी रोहित चिडल्याच त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं. दक्षिण आफ्रिकेची टीम धावांचा पाठलाग करत असताना 37 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. प्रसिद्ध कृष्णाने मॅथ्यूला निर्धाव चेंडू टाकला. त्याआधीच्या चेंडूवर त्याने चौकार मारला होता. प्रसिद्ध ओव्हरमधील शेवटचे दोन चेंडू टाकण्यासाठी रनअप घेण्यासाठी चालला होता. त्यावेळी रोहितने त्याला थांबवलं.

ते रोहितला पटत नव्हतं

प्रसिद्धच्या दिशा आणि टप्प्यावर रोहित अजिबात खुश नव्हता. काही सेकंदांनी दुसरा गोलंदाज हर्षित राणा सुद्धा त्या चर्चेत सहभागी झाला. रोहितने काही हातवाऱ्यांचे इशारे करुन दोघांना लेक्चर दिले. दोघांच्या गोलंदाजीची दिशा आणि टप्प्यावर रोहित चिडलेला दिसला. खासकरुन प्रसिद्ध कृष्णा मॅथ्यू आणि डेवाल्ड बेव्हिसला ज्या पद्धतीची गोलंदाजी करत होता, ते रोहितला पटत नव्हतं.

त्याने 8.2 ओव्हर्समध्ये 85 धावा दिल्या

रोहितने काही गोष्टी सांगितल्यानंतर प्रसिद्धने ओव्हर पूर्ण केली. त्याच्यात थोडीशी सुधारणा दिसली. दोन चेंडूत त्याने फक्त एक रन्स दिला. या सामन्यात प्रसिद्ध कृष्णा भारताच्या पराभवाला तितकाच जबाबदार आहे. त्याने 8.2 ओव्हर्समध्ये 85 धावा देऊन फक्त दोन विकेट काढले. हर्षित राणाने 10 ओव्हरमध्ये 70 धावा देऊन एक विकेट काढला.