युद्धाचा राज्यावर भयंकर परिणाम, गॅसची कमतरता, उद्योग धंदे ठप्प; धार्मिक स्थळांनाही मोठा फटका
Gas Shortage in Maharashtra : आखातातील युद्धाचा फटका राज्याला बसला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच आयात-निर्यातीवर परिणाम झाल्याने अनेक उद्योगांना कच्चा माल मिळत नाहीये यामुळे उद्योजकांची चिंता वाढली आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा फटका महाराष्ट्रालाही बसत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे. तसेच आयात-निर्यातीवर परिणाम झाल्याने अनेक उद्योगांना कच्चा माल मिळत नाहीये, तसेच काही कंपन्यांनी तयार केलेला माल निर्यात होत नसल्याने उद्योजकांची चिंता वाढली आहे. राज्यातील कोणत्या उद्योगांना फटका बसला आणि सध्या काय परिस्थिती आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
शिर्डीतील प्रसाद निर्मितीला फटका बसण्याची शक्यता
देशभरात गॅस टंचाईची शक्यता व्यक्त केली जात असताना शिर्डीतील साईबाबा संस्थानने मात्र भाविकांसाठी दिलासा दायक तयारी केली आहे. दररोज साई प्रसादालयात सरासरी दिड टन गॅसचा वापर होतो. व्यावसायिक गॅस पुरवठा बंद होण्याअगोदरच साईबाबा संस्थानने तशी तयारी केली. शिर्डी साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात सध्या सुमारे 20 टन गॅस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील किमान 20 दिवस प्रसादालयात गॅसची कमतरता भासणार नसल्याची माहिती संस्थान प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दररोज हजारो भाविकांसाठी भोजन तयार केले जात असल्याने गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यासोबतच संस्थानच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा देखील मोठा उपयोग होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भात आणि डाळ शिजवली जात असल्याने गॅसवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी झाले असून प्रसादालयाला मोठा दिलासा मिळत आहे. मात्र अमेरिका–इराण संघर्ष आणखी काही दिवस सुरू राहिला आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला तर भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जळगावातील 400 कंपन्यांना मोठा फटका
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा जळगावातील एमआयडीसीतील एकूण 400 प्लास्टिक उद्योग आणि कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. युद्धामुळे प्लास्टिक उद्योगाला आवश्यक कच्चा मालाच्या किमतीमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झाल्याने उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत. वाढत्या किमतीमुळे कच्च्या मालाची खरेदी परवडत नसल्याने कंपन्या बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. प्लास्टिक कंपन्यांना आवश्यक असलेल्या कच्चामालाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असल्याने किमती वाढल्याचे उद्योजकांचे मत आहे
पिंपरी-चिंचवड मध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा, कंपनी बंद पडण्याची शक्यता
औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण होत असल्याने उद्योगधंद्यांवर त्याचा थेट परिणाम झालाय. अनेक कंपन्यांमध्ये यापूर्वी दोन शिफ्टमध्ये काम सुरू असायचे; मात्र गॅसची कमतरता भासत असल्याने आता अनेक ठिकाणी फक्त एका शिफ्टमध्येच काम सुरू ठेवण्यात येत आहे. परिस्थिती अशीच राहिली आणि कमर्शियल गॅसचा तुटवडा कायम राहिला, तर पुढील दोन ते तीन दिवसांत काही कंपन्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता कंपनी मालकांकडून व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये गॅसचा तुटवडा
अहिल्यानगरच्या औद्योगिक वसाहतीत गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे अनेक उद्योग अडचणीत आले आहे. गॅसवर अवलंबून असलेल्या सुमारे 15 उद्योगांवर याचा थेट परिणाम झाला आहे. सध्या या सर्व उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उद्योगपतींनी प्रशासनाकडे गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असून लवकरच यावर उपाययोजना व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
युद्धामुळे ड्राय फ्रूटच्या बाजाराला फटका
अमेरिका इराण युद्धाचा रायगडमधील माणगावमधील ड्राय फ्रूटच्या बाजाराला फटका बसला आहे. रमजान या पवित्र महिन्यात फळांच्या किमती महागल्या आहेत खजूर ,मनुके, काळे मनुके, अंजीर, पिस्ता यांच्या दरात पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आहे. तसेच सफरचंद, द्राक्षे, किवी यांच्या दरात पंचवीस टक्के वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस तुटवड्यामुळे उद्योग अडचणीत
छत्रपती संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस तुटवड्यामुळे उद्योग अडचणीत सापडले आहेत. नहार्स इंजिनिअरिंगच्या कलर कोटिंग प्लांटमध्ये फक्त 12 तासांचा गॅस साठा शिल्लक आहे. गॅस मिळाला नाही तर उत्पादन प्रक्रिया थांबण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कंपनीतील सुमारे 1200 कामगारांच्या रोजगारावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे औद्योगिक आणि घरगुती गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नहार्स इंजिनिअरिंग उत्पादन विभागाचे अध्यक्ष कृष्णा पारधी यांनी सरकारकडे केली आहे.
