Iran Israel War : इराण-इस्रायल युद्धाचा पहिला मोठा झटका मुंबईला, मुंबईकरांचे खायचे वांदे; किती टक्के हॉटेल तडकाफडकी बंद? आकडा वाचून…
मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. मुंबईत एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा जाणवत असून, यामुळे 20% हॉटेल्स बंद पडली आहेत; 50% बंद पडण्याचा धोका आहे. व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतील व्यत्ययामुळे हॉटेल उद्योगासह सामान्य नागरिकांनाही आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता भारतावर होत आहे. इराण-इस्रायल-अमेरिकेच्या या संघर्षाचा भारतासह अनेक देशांना त्रास होत आहे. या तिन्ही देशांमघ्ये युद्ध पेटल्याने बरेच लोक मारले गेले, तर अनेक जागाही उद्ध्वस्त झाल्या. शेकडो इमारती पडल्या. भारत व इतर देशातील काही नागरीकही युद्धामुळे अडकून पडले आहेत. मात्र याचा मोठा परिणाम भारतातही दिसत असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. एवढंच नव्हे तर याचा परिणाम हॉटेल इंडस्ट्रीवरही होताना दिसत असून गॅस पुरवठ्याच्या संकटामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद पडली आहेत असा अहवाल गॅस हॉटेल असोसिएशन (GAHAAR) ने दिला आहे.
त्यामुळे मुंबईकरांचे बाहेर खाण्यापिण्याचे वांद होणार असून हॉटेलिंग बंद करावं लागण्याची शक्यता आहे. कारण ही परिस्थिती अशीच राहिली तर पुढील दोन दिवसांत 50% हॉटेल्स बंद होऊ शकतात असा इशाराच अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे. हॉटेल्स बंद करण्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. हॉटेल मालकांना त्यांची हॉटेल्स सुरू ठेवायची आहेत की नाही याचा निर्णय त्यांच्यावर अवलंबून असेल.
मुंबईत एलपीजी गॅसचा तुटवडा
इराण-इस्त्राईल-अमेरिकेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आत्ता थेट आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर होतोय, मुंबईत एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवत आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी व्यावसायिक (Commercial) गॅस सिलिंडरची टंचाई झाली असून, घरगुती सिलिंडरसाठीही वाट पाहावी लागत आहे. पुरवठा सुरळीत करण्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे. जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक 19 किलो आणि 5 किलो सिलिंडरचा पुरवठा रोखला आहे.
एवढंच नव्हे तर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही सुमारे 115 रुपयांची वाढ झाली आहे, तर घरगुती (14.2 किलो) सिलिंडरच्या किमतीतही गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. हॉटेल व्यवसायावर परिणाम गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना मोठा फटका बसला असून, पुढील काही दिवस ही स्थिती राहिल्यास 50 टक्क्यांहून अधिक हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे।
अमरावतीमध्येही सिलेंडरचा भडका
आखाती देशातील युद्धाचा परिणाम झाल्याने अमरावती मध्येही सिलेंडरचा भडका उडाला असून घरगुती सिलेंडरसाठी आठवडाभर वेटिंग आहे. याच पार्श्वभूमीवर हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर जपून वापरण्याचं आवाहन गॅस एजन्सीकडून करण्यात आलं आहे. पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये सिलेंडर ही मिळणार नाही असं व्यावसायिकांना सांगण्यात आलं आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांना अतिरिक्त सिलेंडर देणे एजन्सी कडून बंद करण्यात आलं आहे. तसेच घरगुती सिलेंडर साठ रुपयांनी वाढले असून अनेकांना बुकिंग नंतरही सिलेंडर मिळत नाहीयेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत
आखाती देशातील युद्धाचा ऑटो एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तीन दिवसात एलपीजी गॅस दरवाढीचा भडका उडाल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये दर 61 वरून थेट 75 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. पण या दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत, भाडेवाढीची शक्यता आहे. सरकारने ऑटो एलपीजी गॅस दरवाढीवर तोडगा काढावा अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.
नाशिकमध्ये कमर्शिअल सिलेंडर 2 हजारांपार ?
आखाती देशातील युद्धामुळे दरवाढीचा फटका सर्वत्र बसताना दिसत आहे. नाशिकमध्येही परिस्थिती फार वेगळी नाहीये. नाशिकमध्ये कमर्शिअल सिलिंडर 2400 रुपयांवर जाऊ शकतो. त्यामुळे खाद्यपदार्थांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढून ग्राहकांनाही दरवाढीचीची झळ बसू शकते.
छोट्या हॉटेल व्यावसायिकांकडून बेकायदा घरगुती गॅस सिलिंडरचा वापर
गॅसच्या तुटवड्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसता छोट्या हॅाटेलवाल्यांकडून सर्रास बेकायदा घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सुरु करण्यात येत आहे. खरंतर व्यावसायिक हॅाटेलसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरायला परवानगी नाही, मात्र असं असलं तरीही व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॅाटेलमध्ये घरगुती सिलेंडर वापर सुरु केला आहे.
नागपूरातील रॅायल दालचा सेंटरमध्ये सर्रास घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे हॅाटेल बंद ठेवण्यापेक्षा घरचं सिलेंडर आणलं आहे. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने उद्यापासून चुलीवर दालचा तयार करावा लागेल. “आम्ही हॅाटेल बंद ठेवलं तर रोज २०० पेक्षा जास्त ग्राहक परत जातील असं हॉटेल मालकांनी सांगितंलं. एकंदरच छोटे व्यापारी आणि हॅाटेलचालक चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
चेन्नईतही LPG सिलेंडर्सचा तुटवडा
मुंबई व्यतिरिक्त, चेन्नई हॉटेल असोसिएशनने शहरात एलपीजी सिलिंडरच्या तीव्र टंचाईबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संकटावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच व्यावसायिक एलपीजी पुरवठा तात्पुरता थांबवण्याची अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयाचा रेस्टॉरंट्स आणि अन्नाशी संबंधित व्यवसायांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असं असोसिएशनचं म्हणणं आहे.
पंतप्रधानांना पत्र लिहून मागणी
अन्न उद्योग हा अविरत, अगदी 24/7 कार्यरत असतो आणि रुग्णालये, आयटी पार्क आणि महाविद्यालयीन वसतिगृहांसाठी तोच अन्नाचा प्राथमिक स्रोत आहे. ट्रेनमधील प्रवाशांना आणि व्यावसायिक प्रवाशांना अन्न पुरवण्यात देखील हॉटेल्स महत्त्वाची भूमिका बजावतात. सिलिंडर पुरवठ्यात व्यत्यय आल्याने या सर्व सेवा विस्कळीत होतील आणि जनतेला मोठी गैरसोय होईल असेही असोसिएशनने आपल्या पत्रात नमूद केलंय.
परिस्थिती भयानक आहे, असं चेन्नई हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष एम. रवी यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. त्यांच्या सांगण्यानुसार, हॉटेल्समध्ये आता फक्त दोन दिवस पुरेल इतके सिलिंडर आहेत. जर पुरवठा लवकर पूर्ववत झाला नाही तर अनेक हॉटेल्सना त्यांच्या सेवा बंद कराव्या लागू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.
