
पाकिस्तानने तिसरा आणि शेवटचा T20I सामना जिंकून मोठ्या मुश्किलीने आपली इज्जत वाचवली. बांग्लादेश विरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने शानदार प्रदर्शन केलं. त्याच्या 74 धावांच्या बळावर पाकिस्तानने ही मॅच जिंकली. मात्र, तरीही बांग्लादेशच्या टीमने तीन T20I सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. पहिले दोन t20 सामने जिंकून बांग्लादेशने मालिका आधीच जिंकली होती. पाकिस्तानसाठी तिसरा सामना प्रतिष्ठेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. अन्यथा त्यांच्या नावावर 3-0 अशा मानहानीकारक पराभवाची नोंद झाली असती. शेवटच्या सामन्यात पुनरागमन करत पाकिस्तानने बांग्लादेश विरुद्ध मोठ्या विजयाची नोंद केली. आधी ही मालिका 5 सामन्यांची होणार होती. पण नंतर सामने घटवून तीन सामन्यांची सीरीज खेळवण्यात आली.
पहिले दोन t20 सामने गमावल्यानंतर ढाका मीरपुरच्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण बांग्लादेशची टीम 16.4 ओव्हर्समध्ये 104 धावांवर ऑलआऊट झाली. शेवटच्या सामन्यात पाकिस्तानी टीमने 74 धावांनी विजय मिळवला.
क्लीनस्वीप करण्यात अपयश
या सीरीजमधील पहिला सामना बांग्लादेशने 7 विकेटने जिंकलेला. दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 8 धावांनी हरवलं. पण ते सीरीजमध्ये क्लीनस्वीप करु शकले नाहीत. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने 41 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या. या शानदार इनिंगसाठी त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.
17 चेंडूत 33 धावांची वेगवान इनिंग
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानी टीमने चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 47 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ओपनर सॅम अयूब 21 धावा करुन आऊट झाला. काहीवेळाने साहिबजादा फरहान पॅवेलियनमध्ये परतला. मोहम्मद हॅरिस काही जास्त करु शकला नाही. केवळ 5 धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर हसन नवाजने टीमचा डाव संभाळला. 17 चेंडूत 33 धावांची वेगवान इनिंग तो खेळला.
बांग्लादेशची खूप खराब सुरुवात
मोहम्मद नवाजने 16 चेंडूत 27 रन्स केल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने 7 विकेटवर 178 धावा केल्या. बांग्लादेशकडून वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदने सर्वाधिक तीन विकेट काढल्या. नसुम अहमदला दोन विकेट मिळाल्या. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या बांग्लादेशची खूप खराब सुरुवात झाली.
179 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या बांग्लादेशने खूप खराब सुरुवात केली. त्यांचे पाच विकेट 25 धावांवरच पडले. त्यानंतर यजमान संघ सामन्यात पुनरागमन करुच शकला नाही. त्यांची संपूर्ण टीम 16.4 ओव्हरमध्ये 104 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतली. बांग्लादेशकडून मोहम्मद सैफुद्दीनने सर्वाधिक 35 धावा केल्या. पाकिस्तानकडून सलमान मिर्जा सर्वाधिक तीन विकेट काढल्या. फहीम अशरफ आणि मोहम्मद नवाजने प्रत्येकी दोन-दोन विकेट काढले.