ज्याच्यासाठी 25 कोटी मोजले, त्याच्याच तोंडातून रक्त, KKRचं टेन्शन वाढलं, स्टार खेळाडूला झालंय काय?
Cameron green injury : शाहरुख खानची टीम केकेआरचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. काल या खेळाडूवर 25.20 कोटी खर्च करुन रिटेन केलं आणि आज तो प्रचंड गंभीर जखमी झाला आहे. नेमकं काय घडलंय?

आयपीएल 2027 साठी कोलकाता नाइट रायडर्सने कॅमेरून ग्रीनला 25.20 कोटी रुपये देऊन संघात कायम ठेवलं. मात्र, या निर्णयानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूला मैदानात दुखापत झाली. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनचा बाऊन्सर थेट ग्रीनच्या हेल्मेटच्या ग्रिलला लागला. या धडकेमुळे त्याच्या ओठातून रक्त येऊ लागलं आणि त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावं लागलं.
329 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रीन 10 चेंडूंत 3 धावा करून खेळत होता. अॅटकिन्सनने 140.8 किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या बाऊन्सरवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना ग्रीनला ही दुखापत झाली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला कनकशन झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे ऑलिव्हर पीकला कनकशन सब्स्टिट्यूट म्हणून संघात संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 97 धावांनी गमावला आणि मालिका 1-2 ने गमावली.
सध्या देशातील क्रिकेटप्रेमींना आयपीएलच्या नव्या हंगामाची प्रतिक्षा लागली आहे. क्रिकेटच्या या महापर्वाचं यंदाचं विसावं वर्ष आहे. काल म्हणजे 17 नोव्हेंबर 2026 रोजी आयपीएलच्या सर्व 10 फ्रँचायझींचे रिटेन्शन पार पडले. या रिटेन्शनमध्ये अनेक खेळाडूंना रिटेन आणि अनेकांना रिलीज करण्यात आले. केकेआर म्हणजे शाहरुख खानचा कोलकाता नाईडर्सनेही अनेकांना रिटेन केलं. त्यामध्ये कॅमेरुन ग्रीनवर 25. 20 कोटी रुपयांचा मोठा निधी खर्चून त्याला संघासाठी कायम ठेवलं. पण आता या घडलेल्या दुखापतीमुळे काही प्रमाणात केकेआरचं टेन्शन वाढलं आहे.
केकेआरचं टेन्शन वाढण्यामागचं कारण केवळ पैसेच नाहीये, तर कॅमेरुनने संघासाठी मागील वर्षीच्या हंगामामध्ये एकूण 14 सामने खेळले होते. त्यामध्ये त्याने 322 रन केले होते. तर 7 विकेटही घेतले होते. त्यानंतर आता यंदाही केकेआर त्याचं रकमेत केकेआरसाठी खेळणार आहे. पण केकेआरच्या या निर्णयाने अनेकांचा आश्चर्यही वाटल्याचं बोललं जात आहे. कारण गेल्या हंगामामध्ये केकेआरने विदेशी खेळाडू म्हणून त्याच्यावर 25.20 कोटींची रक्कम मोजली होती, जी इतिहासातील सर्वाधिक रक्कम होती.