Asia Cup 2025 स्पर्धेसाठी 7 संघ जाहीर, या संघाचं होणार पदार्पण, जाणून घ्या

T20i Asia Cup 2025 : आयसीसीकडून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे 2026 मध्ये करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर 1 वर्षाआधी आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Asia Cup 2025 स्पर्धेसाठी 7 संघ जाहीर, या संघाचं होणार पदार्पण, जाणून घ्या
Asia Cup Trophy
Image Credit source: acc x account
| Updated on: Aug 30, 2025 | 1:53 AM

बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आशिया कप स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या संघात एक ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ असणार आहे. आतापर्यंत या 8 पैकी 7 संघांची घोषणा करण्यात आली आहे. यूएईमध्ये या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. मात्र यजमान संघानेच आतापर्यंत संघ जाहीर केलेला नाही. यूएई व्यतिरिक्त इतर सर्व 7 संघांची घोषणा करण्यात आली आहे. या 8 संघांना 2 गटांमध्ये विभागलं गेलं आहे. गतविजेता भारत, पाकिस्तान, यजमान यूएई आणि ओमान असे 4 संघ अ गटात आहेत. तर ब गटात गतउपविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि हाँगकाँग आहे.

7 संघ आणि 7 कर्णधार

सलमान अली आगा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. सूर्याची टी 20i कर्णधार म्हणून ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यात भारतीय संघ गतविजेता आहे. त्यामुळे सूर्यासमोर या स्पर्धेत पहिल्यांदाच नेतृत्व करत असताना भारताकडे आशिया कप ट्रॉफी कायम राखून ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. लिटन दास बांगलादेशचा कर्णधार आहे. ऑलराउंडर राशीद खान अफगाणिस्तानची कॅप्टन्सी करणार आहे. यासिम मुर्तजा याच्याकडे हाँगकाँगची सूत्रं आहेत. मुळ भारतीय वंशाचा असलेला जतिंदर सिंह हा ओमानच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर अजूनही यूएईने टीम जाहीर केलेली नाही.

ओमानचं पदार्पण

ओमान टीमची टी 20i आशिया कप स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. आशिया कप स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ सहभागी होत आहेत. याआधी या स्पर्धेसाठी 5 संघ थेट पात्र व्हायचे. तर 1 संघ पात्रता फेरीतून निश्चित व्हायचा. मात्र आता नियम बदलले. त्यामुळे एसीसी प्रीमियर स्पर्धेतील विजेता, उपविजेता आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांना आशिया कप स्पर्धेत खेळण्याची संधी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संघांची संख्या 6 वरुन 8 वर पोहचली आहे.

सर्व सामने 2 स्टेडियमध्येच

दरम्यान या स्पर्धेतील सर्व सामने हे दुबई क्रिकेट स्टेडियम आणि अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.