
आयपीएल स्पर्धेत गेल्या काही वर्षांपासून संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. या संघाची सूत्र हाती घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्स 2022 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्यानंतर संघाची कामगिरी काही चांगली राहिली नाही. मागच्या पर्वातही संघाने काही खास केलं नाही. असं असताना संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडणार अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना धक्का बसला आहे. पण या बातम्यांमध्ये किती तथ्य हे अद्याप काही स्पष्ट नाही. आता या विषयावर आकाश चोप्राने आपलं मत मांडलं आहे. संजू सॅमसनची गरज राजस्थानला नसल्याचं दिसत आहे, असं त्याने सांगितलं. कारण वैभव सूर्यवंशीमुळे राजस्थानकडे दोन्ही सलामीवीर आहेत, अशी शक्यता त्याने वर्तवली. युट्यूब चॅनेलवर त्याने याबाबतचं विश्लेषण केलं आहे. वैभव सूर्यवंशीच्या आगमनामुळे संघाला एक चांगला खेळाडू मिळाला आहे. वय आणि त्याचा खेळ पाहून संघाला भविष्यात बराच फायदा होणार आहे. इतकंच काय तर यशस्वी जयस्वालला ओपनिंगसाठी एक चांगला पार्टनर मिळणार आहे.
संजू सॅमसन या संघात स्वत:ला फिट मानत नसावा, असं मत आकाश चोप्राने व्यक्त केलं आहे. ‘मला वाटते की नव्या लिलावात संघाचा जो विचार आहे. त्यात संजू सॅमसनची मोठी भूमिका असेल, पण आता वाटते की तसं नाही. वैभव सूर्यवंशी आला आहे आणि दोन ओपनर तयार आहेत. ध्रुव जुरेलपण वर फलंदाजी करू शकतो. कदाचित संजूचं मन असं असावं की निघायची वेळ झाली आहे. तो असाही विचार करू शकतो. मला माहिती नाही. ही फक्त एक शक्यता आहे. मला माहिती नाही की त्याच्या आणि राजस्थानच्या मनात काय सुरु आहे.’
संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स सोडलं तर कोणते संघ त्याला घेण्यास तयार असतील? यावर आकाश चोप्राने सांगितलं की, कोलकाता नाईट रायडर्ससाठी संजू हा चांगला पर्याय ठरू शकतो. कोलकात्याला सलामी फलंदाज, विकेटकीपर आणि अजिंक्य रहाणेनंतर एक चांगला कर्णधार पाहीजे. हे तिन्ही संजू सॅमसनच्या माध्यमातून येतील. त्यामुळे संघ मजबूत होईल. दुसरीकडे, आकाश चोप्राच्या मते मुंबई इंडियन्स देखील एका विकेटकीपरच्या शोधात आहे. संजू त्यांच्यासाठीही चांगला पर्याय ठरू शकतो.