Cricket : आशिया कपनंतर टी20i-वनडे सीरिजचा थरार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?

T20i and Odi Series : क्रिकेट चाहत्यांना आशिया कपनंतरही टी 20i आणि वनडे क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे. अफगाणिस्तान मायदेशात बांगालदेश विरुद्ध 2 मालिकांमध्ये एकूण 6 सामने खेळणार आहे. जाणून घ्या.

Cricket : आशिया कपनंतर टी20i-वनडे सीरिजचा थरार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?
Afghanistan vs India Virat Kohli
Image Credit source: Bcci
| Updated on: Aug 24, 2025 | 10:04 PM

आशिया कप 2025 स्पर्धेला यूएईत 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीकडे आहे. यंदा पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 8 संघांना अ आणि ब गटात 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. अ गटात भारत, पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर ब गटात चांगलीच झुंज पाहायला मिळणार आहे. ब गटात अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँग असे 4 संघ आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 8 संघ सहभागी झाल्याने क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. तसेच याआधीच्या तुलनेत यंदा अधिकचे सामनेही होणार असल्याचं स्पष्ट आहे.

आतापर्यंत या स्पर्धेसाठी 5 संघ जाहीर करण्यात आले. पाकिनस्तानने सर्वात आधी संघ जाहीर केला. त्यानंतर भारताने टीमची घोषणा केली. भारतानंतर हाँगकाँग आणि बांगलादेशने त्यांच्या खेळाडूंची नावं जाहीर केली. तर रविवारी 24 ऑगस्टला अफगाणिस्तानने संघाची घोषणा केली. त्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आणखी एक घोषणा केली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप स्पर्धेनंतर मायदेशात टी 20i आणि एकदिवसीय मालिकेचं आयोजन करणार असल्याचं जाहीर केलं. क्रिकेट बोर्डाने या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश टी 20i आणि वनडे सीरिज होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. तसेच या 2 मालिका 2 स्टेडियममध्ये होणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

बांगलादेशचा अफगाणिस्तान दौरा

उभयसंघात 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान टी 20i मालिका होणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे शारजाह क्रिकेट स्टेडियमध्ये होणार आहेत. त्यानंतर 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान एकदिवसीय मालिकेतील सामने होणार आहेत. हे सामने अबुधाबीतील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत.

टी 20i सीरिज

पहिला सामना, गुरुवार, 2 ऑक्टोबर

दुसरा सामना, शुक्रवार 3 ऑक्टोबर

तिसरा सामना, रविवार, 5 ऑक्टोबर

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, बुधवार, 8 ऑक्टोबर

दुसरा सामना, शनिवार 11 ऑक्टोबर

तिसरा सामना, मंगळवार, 14 ऑक्टोबर

दरम्यान अफगाणिस्तान, यूएई आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेआधी 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान टी 20i ट्राय सीरिजचं आयोजन करण्यात आलं आहे. या मालिकेत प्रत्येक संघ एकूण 4 सामने खेळणार आहे.