
मुंबई : भारताने वनडे क्रिकेटमध्ये गेल्या काही महिन्यात अपेक्षित कामगिरी केली आहे. वेस्ट इंडिज दौरा, आशिया कप जेतेपद आणि आता ऑस्ट्रेलियाला 2-1 पराभूत केलं आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाने सकारात्मक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटच्या वनडे मालिकेत भारताला विजय मिळवता आला नाही. पण 352 धावांचा पाठलाग करताना काय चुका घडल्या? याचं आकलन करता आलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अशात चुकांची पुनरावृत्ती टाळणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, सामन्यातील पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याने संघातील खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. पराभव जरी दुर्दैवी असला तरी पुढचा दीड महिना किती महत्त्वाचा आहे याची आठवण करून दिली.
“दुर्दैवाने आज आपल्याला अपेक्षित निकाल मिळाला नाही. बुमराहच्या कामगिरीवर मी खूप खूश आहे. जेव्हा आपण 15 खेळाडूंबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्याला काय हवे आहे हे अगदी स्पष्ट असते. आम्ही संभ्रमात बिलकुल नाहीत. आम्हाला माहित आहे की आम्ही एक संघ काय करत आहोत. हा एक सांघिक खेळ आहे आणि प्रत्येकाने या आपली भूमिका बजावावी लागणार आहे. तर आम्ही चॅम्पियनशिप जिंकू. प्रत्येकाने शरीराची काळजी घेतली पाहीजे आणि पुढील दीड महिने फीट राहण्याचा प्रयत्न करा.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंड संघ आमनेसामने येणार आहेत. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत 8 ऑक्टोबरला असणार आहे. या सामन्यात मालिकेतील अनुभव गाठिशी असणार आहे. दुसरीकडे, टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.