Asia Cup 2023 : टीम इंडियाला पाकिस्तानचं ’92 चेंडूंचं चॅलेंज’, रोहित-विराट यांच्यासमोर मोठा पेच

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 2 सप्टेंबरला भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत आहे. पण या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या 92 चेंडूंची दहशत पसरली आहे.

Asia Cup 2023 : टीम इंडियाला पाकिस्तानचं 92 चेंडूंचं चॅलेंज, रोहित-विराट यांच्यासमोर मोठा पेच
| Updated on: Aug 23, 2023 | 3:24 PM

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी सहा संघांमध्ये चुरस रंगणार आहे. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी पाकिस्तान आणि भारत प्रमुख दावेदार मानले जात आहेत. तर श्रीलंका कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. त्याचबरोबर बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे दोन संघ मोठ्या संघाचं स्वप्न भंग करू शकतात, अशी स्थिती आहे. तर नेपाळ सध्या तरी लिंबूटिंबू संघ गणला जात आहे. असं असताना पाकिस्ताननं या स्पर्धेपूर्वी 92 चेंडूंची दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतासमोर पाकिस्तानचं मोठं आव्हान असणार आहे. कारण पाकिस्ताननं अफगाणिस्तानचा अवघ्या 92 चेंडूत खेळ खल्लास केला आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे सामन्यात पाकिस्तानने फक्त 201 धावा केल्या होत्या. हे आव्हान गाठणंही अफगाणिस्तानला कठीण झालं.

शाहीन शाह आफ्रीदी, नसीम शाह आणि हारिस रउफ या तिघाडीने अफगाणिस्तानची दाणादाण उडवून दिली. 201 धावांचा पाठलाग करणारा अफगाणिस्तानचा संघ फक्त 59 धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानचा संघ 50 षटकांपैकी फक्त 19.2 षटकंच खेळू शकला. त्यामुळे पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक भारतासमोर मोठं आव्हा असणार आहे. आशिया कप स्पर्धेत 2 सप्टेंबर 2023 रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी टीम इंडियासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

टीम इंडियासमोर 92 चेंडूचं आव्हान

पाकिस्तानकडून तीन वेगवान गोलंदाजांनी एकूण 92 चेंडू टाकले. तिघांनी अफगाणिस्तानची संपूर्ण फलंदाजी उद्ध्वस्त करून टाकली. हारिस रऊफ याने 5 गडी बाद केले. तर शाहीन आफ्रिदीला 2 आणि नसीम शाह याला एक गडी बाद करता आला. या तिन्ही गोलंदाजांची इकॉनोमी रेट 3 रन प्रति ओव्हरपेक्षा कमी होता. या गोलंदाजांचा सामना करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडाली.

टीम इंडियासमोर पाकिस्तानी गोलंदाजांचं आव्हान

पाकिस्तानच्या तिन्ही गोलंदाजांचा वेग जबरदस्त आहे. तिघांनी वेगवान आणि बाउंस चेंडूंनी फलंदाजांनी सळो की पळो करून सोडलं. विकेट फिरकीपटूंसाठी अनुकूल असूनही तिघांनी कमाल केली. त्यामुळे आशिया कप स्पर्धेपूर्वी या तिन्ही गोलंदाजांना लय सापडल्याने भारतासमोरचं आव्हान वाढलं आहे. भारताच्या टॉप चार फलंदाजांना तिन्ही गोलंदाजांचं मोठं आव्हान असणार आहे. आता भारतीय फलंदाज या गोलंदाजांचा कसा सामना करतात हे 2 सप्टेंबरला दिसून येईल.