
टीम इंडियाने रविवारी 14 सप्टेंबरला पाकिस्तानवर मात करत आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला. टीम इंडियाचा हा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह सुपर 4 मध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार असल्याची चर्चा रंगली आहे. समीकरणं जुळल्यास रविवारी 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा हे 2 शेजारी आमनेसामने येऊ शकतात. मात्र काही तासांसाठी आशा धुसर झाली होती. टीम इंडियासोबत ए ग्रुपमध्ये असलेल्या पाकिस्तानने यूएई विरुद्ध 17 सप्टेंबर रोजी होणार्या सामन्यावर बहिष्कार घातल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात होतं. मात्र तासाभरात पाकिस्तान हा सामना खेळणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? याबाबतचा अंतिम फैसला काही तासात होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचं भवितव्य हे पाकिस्तान विरुद्ध यूएई सामन्याच्या निकालावर अवलंबून आहे. पाकिस्तानने हा सामना जिंकला तरच पुन्हा एकदा रविवारी महामुकाबला होईल. मात्र यूएईने विजय मिळवला तर 2 शेजारी देशांमध्ये होणारा संभावित सामना होणार नाही.
पाकिस्तान आणि यूएई या दोन्ही संघांनी आशिया कप 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत प्रत्येकी 2 पैकी 1-1 सामना जिंकला आहे. दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 2-2 पॉइंट्स आहेत. मात्र पाकिस्तानचा नेट रनरेट यूएईच्या तुलनेत चांगला आहे. दोन्ही संघांसाठी सुपर 4 च्या दृष्टीने पाकिस्तान-यूएई हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरो असा आहे. जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये पोहचेल. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे या सामन्याच्या निकालानंतरच भारत-पाकिस्तान रविवारी आमनेसामने येणार की नाहीत? हे समजेल. तसेच ए ग्रुपमधून टीम इंडियानंतर सुपर 4 मध्ये पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने रविवारी 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नव्हतं. पाकिस्तानने त्यानंतर हस्तांदोलनाच्या वादावरुन आयीसीकडे मॅच रेफरी एन्डी पाईक्रॉफ्ट यांच्याविरोधात तक्रार केली होती. एन्डी पाईक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघाना हस्तांदोलन करु नका असं सांगितलं होतं, असा आरोप पीसीबीने केला होता. मात्र पाकिस्तानने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं. त्यानंतर पीसीबीने आयसीसीकडे पुन्हा मेलद्वारे तक्रार केली. मात्र या तक्रारीला काहीच अर्थ नसल्याचा निर्वाळा आयसीसीने दिला. त्यानंतर झालेल्या बैठकीत पाकिस्तानने यूएई विरुद्ध खेळणार होकार दिला.
दरम्यान पाकिस्तानने यूएई विरुद्धचा न खेळण्याचा निर्णय फक्त पैशांसाठी बदलल्याचं म्हटलं जातं आहे. पाकिस्तानने या स्पर्धेतून बाहेर होण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांना एसीसीकडून मिळणारी रक्कम मिळाली नसती. त्यामुळे पाकिस्तानला 141 कोटी रुपयांचं नुकसान झालं असतं.