
टीम इंडियाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने गेल्या वर्षभरात टी 20I क्रिकेटमध्ये छाप सोडली आहे. अभिषेकने अवघ्या काही सामन्यांमध्येच निवड समितीचा विश्वास जिंकला आहे. अभिषेकेने काही महिन्यांमध्येच भारतीय टी 20I संघातील स्थान निश्चित केलं आहे. अभिषेकने टी 20I आशिया कप 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभिषेकने सुपर 4 फेरीत अनुक्रमे पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध 50 धावा करत अर्धशतकांची हॅटट्रिक करत टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. आता अभिषेक पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. अभिषेकच्या निशाण्यावर या महाअंतिम सामन्यात माजी फलंदाज विराट कोहली याचा विक्रम आहे. अभिषेकला विराटला मागे टाकण्यासाठी फक्त 11 धावांचीच गरज आहे. विराटचा तो नक्की रेकॉर्ड काय आहे? हे जाणून घेऊयात.
अभिषेकने श्रीलंकेविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. अभिषेकने श्रीलंकेविरुद्ध एकूण 61 धावा केल्या. अभिषेक यासह आशिया कप स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक आणि 300 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. अभिषेकने आतापर्यंत या आशिया कप 2025 स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये 51 पेक्षा अधिकच्या सरासरीने आणि 204.63 च्या स्ट्राईक रेटने 309 धावा केल्या आहेत. अभिषेकने या दरम्यान 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच अभिषेकची 75 ही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
आता अभिषेक पाकिस्तान विरुद्ध फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिषेककडे या सामन्यात विराटचा बहुराष्ट्रीय टी 20I स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. अभिषेक या विक्रमापासून केवळ 11 धावा दूर आहे. अभिषेकच्या नावावर 309 धावा आहेत. तर विराटने 2014 साली टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत 6 डावात 106.33 च्या सरासरीने 4 अर्धशतकांसह एकूण 319 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना रविवारी 28 सप्टेंबरला महाअंतिम सामन्यात अभिषेकच्या 11 व्या धावेची प्रतिक्षा लागून आहे.
दरम्यान अभिषेक शर्मा याने या 17 व्या आणि टी 20i आशिया कप स्पर्धेत तुफान फटकेबाजी करत गोलंदाजांची धुलाई केली आहे. अभिषेकने एकूण 309 धावांदरम्यान 31 चौकार आणि 19 षटकार लगावले आहेत. अभिषेकने चौकारांच्या मदतीने 124 तर षटकारांच्या सहाय्याने 114 मिळून एकूण 238 धावा केल्या आहेत.