T20i क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर? रोहित-विराट कितव्या स्थानी?

Highest Individual Score in T20I For Team India : टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमधील एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या.

T20i क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर? रोहित-विराट कितव्या स्थानी?
Rohit Sharma and Virat Kohli Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 25, 2025 | 11:17 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ खेळताना दिसणार आहेत. 17 व्या आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईकडे आहे.  या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही संघात 14 स्पटेंबरला सामना होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला कडाडून विरोध केला जात होता. मात्र केंद्र सरकारने या सामन्याला हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर हा सामना होणार, हे निश्चित झालंय.

अवघ्या काही महिन्यांनी 2026 या वर्षांत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर 2022 नंतर पुन्हा एकदा आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. टी 20 क्रिकेटमध्ये फटकेबाजी पाहायला मिळते. त्यामुळे या आशिया कप स्पर्धेतही अशीच फटकेबाजी अपेक्षित आहे. या निमित्ताने टी 20i क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर आहे? भारतापैकी या यादीत कोण आहे का? हे सविस्तर जाणून घेऊयात.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला टी 20 सामना हा 2005 साली खेळवण्यात आला. त्यानंतर टी 20 क्रिकेटची लोकप्रियता झपाट्याने वाढली. टी 20 क्रिकेटच्या लोकप्रियतेत आयपीएल स्पर्धेचंही योगदान आहे. टी 20i क्रिकेटमध्ये फलंदाजांची स्फोटक खेळी पाहायला मिळते. आतापर्यंत अनेक फलंदाजांनी 200, 250 आणि 300 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. आशिया कप टी 20 फॉर्मेटने होत आहे. या पार्श्वभूमीवर टी 20i क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावा करण्याचा रेकॉर्ड कुणाच्या नावावर आहे? हे जाणून घेऊयात.

एका टी 20i इनिंगमध्ये सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरोन फिंच याच्या नावावर आहे. फिंचने 2018 साली लिंबुटिंबु झिंबाब्वे विरुद्ध 172 धावा केल्या होत्या. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा हजरतुल्लाह झझाई विराजमान आहे. हजरतुल्लाहने आयर्लंड विरुद्ध जोरदार फटकेबाजी केली होती. अफगाणिस्तानच्या फलंदाजाने तेव्हा 162 धावा केल्या होत्या. तिसर्‍या स्थानी पुन्हा फिंचच आहे. फिंचने इंग्लंड विरुद्ध 156 धावा केल्या होत्या. फिंच टी 20i क्रिकेटमध्ये 2 वेळा 150 पेक्षा अधिक धावा करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज आहे.

भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा

  1. रोहित शर्मा : 121 धावा
  2. विराट कोहली : 122 धावा
  3. ऋतुराज गायकवाड : 123 धावा
  4. शुबमन गिल : 126 धावा
  5. अभिषेक शर्मा : 135 धावा

दरम्यान भारतासाठी टी 20i मधील एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे.अभिषेकने अवघ्या काही महिन्यांपूर्वी इंग्लंड विरुद्ध भारतासाठी रेकॉर्ड ब्रेक खेळी साकारली होती. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध शुबमन गिल याच्या 126 धावांचा विक्रम मोडीत काढला होता. तसेच भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांमध्ये अभिषेक, शुबमन व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. भारताच्या या 5 फलंदाजांनी 120 पेक्षा जास्त धावा केल्यात.