Sachin Tendulkar : रोहित-विराटची निवृत्ती, टीम इंडियाचा पुढील स्टार कोण? सचिन म्हणाला…
Sachin Tendulkar On Team India Future Star : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया अनेक बदलातून जात आहे. हे दोघेही भारताचे स्टार खेळाडू होते. रोहित आणि विराट या दोघांनीही कर्णधार आणि फलंदाज म्हणून असंख्य विक्रम केले.

क्रिकेटचा देव आणि भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर निवृत्तिनंतरही कायम चर्चेत असतो. सचिन चाहत्यांसह सोशल मीडियावर पोस्ट करतो. तसेच सचिनने आतापर्यंत अनेकदा भारतीय संघाचं सोशल मीडियावरुन उल्लेखनीय कामगिरीसाठी अभिनंदनही केलंय. सचिनची गेल्या काही दिवसांपासून आणखी चर्चा पाहायला मिळत आहे. सचिनचा मुलगा आणि गोवा क्रिकेट टीमचा ऑलराउंडर अर्जून तेंडुलकर याचा साखरपूडा झाला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वी सचिनची लेक सारा तेंडुलकर हीने तिच्या सेंकड इनिंगला सुरुवात केली. साराने मुंबईत पिलाटेस स्टुडियोची सुरुवात केली. या स्टुडिओच्या उद्घाटनावेळेस सचिन उपस्थित होता. त्यानंतर आता सचिनने सोशल मीडियावर आस्क मी एनिथींगद्वारे (Ask Me Anything) चाहत्यांसह सवांद साधला. सचिनने या दरम्यान चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
सचिनने या खास सेशन दरम्यान चाहत्यांसह भारतीय क्रिकेटच्या भविष्याबाबत भाष्य केलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या अनुभवी जोडीने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केला. सचिनने या खास सेशनदरम्यान रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाची वाटचाल आणि युवा स्टार खेळाडूंबाबत चर्चा केली. भारतीय संघातील अनेक युवा खेळाडू हे रोहित-विराटचा वारसा पुढे नेण्यासाठी तयार असल्याचंही सचिनने म्हटलं.
सचिन काय म्हणाला?
सचिनने काही वर्षांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात रोहित आणि विराट त्याचा क्रिकेटमधील वारसा पुढे नेतील, असं म्हटलं होतं. एका चाहत्याने सचिनला याच विधानावरुन प्रश्न केला. विराट आणि रोहितनंतर त्यांची जागा कोण घेऊ शकतो? असा प्रश्न चाहत्याने केला.
“विराट आणि रोहित क्रिकेटमधील वारसा पुढे चालवतील असं तुम्ही 2010 साली म्हटलं होतं, जे खरं ठरलं. आता विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर त्या दोघांचा वारसा पुढे नेण्याची क्षमता कुणामध्ये आहे? ” असा प्रश्न चाहत्याने सचिनला केला.
“हो. विराट आणि रोहित या दोघांनी भारताचा अनेकदा गौरव वाढवला आहे. भारताचं भविष्य चांगल्या हातात आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली. या दोघांचा वारसा पुढे नेणारे अनेक दावेदार आहेत”, असं सचिनने म्हटलं.
भारताची अनुभवी जोडी
दरम्यान रोहित आणि विराट या दोघांनी टी 20i आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता हे दोघे फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहेत.
