Asia Cup 2025 : सुपर फोरसाठी 4 संघ फिक्स, टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा? पाहा वेळापत्रक

Asia Cup 2025 Super 4 Schedule : अखेर 11 सामन्यांनंतर सुपर 4 साठीचे संघ निश्चित झाले आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी सुपर 4 चं तिकीट मिळवलं आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

Asia Cup 2025 : सुपर फोरसाठी 4 संघ फिक्स, टीम इंडियाचा पहिला सामना केव्हा? पाहा वेळापत्रक
Asia Cup 2025 Super 4 Schedule
Image Credit source: Acc X Account
| Updated on: Sep 19, 2025 | 2:52 AM

आशिया कप 2025 स्पर्धेत गुरुवारी 18 सप्टेंबरला साखळी फेरीतील 11 वा सामना पार पडला. श्रीलंकेने या सामन्यात अफगाणिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. श्रीलंकेने विजयासाठी मिळालेलं 170 धावांचं आव्हान हे 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. श्रीलंकेचा साखळी फेरीतील एकूण आणि सलग तिसरा विजय ठरला. श्रीलंकेच्या या विजयानंतर बी आणि ए या दोन्ही ग्रुपमधून सुपर 4 साठी एकूण 4 संघ निश्चित झाले. सुपर 4 फेरीत एकूण किती सामने होणार? या फेरीला केव्हापासून सुरुवात होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

बी ग्रुपमधून आधीच हाँगकाँगचा बाजार उठला होता. त्यामुळे सुपर 4 साठी बी ग्रुपमधून 2 जागांसाठी श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस होती. अफगाणिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला असता तर ते सुपर 4 साठी पात्र ठरले असते. तसेच श्रीलंकेने पराभवानंतरही जवळपास सुपर 4 साठी धडक दिली असती. मात्र श्रीलंकेने विजय मिळवून अफगाणिस्तानला स्पर्धेतून बाहेर केलं आणि बांगलादेशला सुपर 4 मध्ये पोहचवण्यात अप्रत्यक्ष मदत केली. अशाप्रकारे बी ग्रुपमधून श्रीलंका आणि बांगलादेश 2 संघ सुपर 4 मध्ये पोहचले.

सुपर 4

तर ए ग्रुपमधून आधीच टीम इंडिया आणि पाकिस्तान या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघांनी सुपर 4 मध्ये धडक दिली. अशाप्रकारे श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याच्या निकालानंतर सुपर 4 साठी संघ निश्चित झाले आहेत. सुपर 4 फेरीत 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान एकूण 6 सामने होणार आहेत. या फेरीत प्रत्येक संघाला आपल्या गटातील टीमसह विरोधी गटातील 2 संघांसह प्रत्येकी 1-1 असे एकूण 3 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर सर्वाधिक सामने जिंकणारे 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

सुपर 4 मधील संघ

इंडिया ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये प्रवेश करणारी पहिली टीम आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कोड हा (A1) आहे. तर पाकिस्तान ए ग्रुपमधून सुपर 4 मध्ये पोहचणारी दुसरी टीम आहे. त्यामुळे पाकिस्तानचा कोड (A2) आहे. बी ग्रुपमधून श्रीलंका पात्र ठरल्याने ते (B1) आहेत तर बांगलादेश (B2) आहेत.

सुपर 4 मधील पहिला सामन्यात आमनेसामने कोण?

सुपर 4 मधील पहिल्याच सामन्यात श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. तर टीम इंडिया सुपर 4 मध्ये साखळी फेरीनंतर पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना रविवारी 21 सप्टेंबरला होणार आहे.

सुपर 4 फेरीचं वेळापत्रक

  1. 20 सप्टेंबर, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, दुबई
  2. 21 सप्टेंबर, भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
  3. 23 सप्टेंबर, पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, अबुधाबी
  4. 24 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश, दुबई
  5. 25 सप्टेंबर, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, दुबई
  6. 26 सप्टेंबर, टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका, दुबई
  7. 28 सप्टेंबर, अंतिम सामना, दुबई