
टीम इंडियाने बुधवारी 24 सप्टेंबरला सुपर 4 फेरीत बांगलादेशला पराभूत करत आशिया कप 2025 स्पर्धेतील एकूण आणि सलग पाचवा विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता टीम इंडिया विरुद्ध अंतिम फेरीत कोणता संघ भिडणार? हे गुरुवारी 25 सप्टेंबरला निश्चित होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 4 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. दोन्ही संघांनी सुपर 4 फेरीतील 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर 1 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना सेमी फायनलप्रमाणेच आहे. त्यामुळे येत्या काही तासांत अंतिम फेरीतील दुसरा संघ निश्चित होणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र हा सामना पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल? हे जाणून घेऊयात.
पाकिस्तान-बांगलादेश सामन्यासाठी राखीव दिवसाची (Reserve Day) तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे उभयसंघातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना समसमान 1-1 गुण देण्यात येईल. तसेच या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला असल्याने त्यांच्या खात्यात 2-2 गुण आहेत. तसेच सामना रद्द झाल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघांचे प्रत्येकी 3-3 पॉइंट्स होतील. समसमान पॉइंट्स असल्याने दोघांपैकी अंतिम फेरीत पोहचणाऱ्या संघाचा निकाल हा नेट रनरेटच्या आधार घेतला जाईल.
टीम इंडिया सुपर 4 फेरीतील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. श्रीलंका सर्वात शेवटी अर्थात चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तान दुसऱ्या आणि बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पाऊस किंवा इतर कारणामुळे सामना रद्द झाल्यास पाकिस्तान नेट रनरेच्या आधारावर अंतिम फेरीत पोहचणार हे निश्चित आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना साखळी, सुपर 4 नंतर अंतिम फेरीत 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघात पुन्हा महामुकाबला पाहायला मिळेल.
ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानचा नेट रनरेट हा बांगलादेशच्या तुलनेत कित्येक पटीने चांगला आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट +0.226 असा आहे. तर बांगलादेशचा नेट रनरेट -0.969 असा आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास बांगलादेशचं स्पर्धेतून पॅकअप होईल. तर पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.