
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून होती. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 19 ऑगस्टला मुंबईत आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. त्यानुसार सूर्यकुमार यादव आशिया कप स्पर्धेत नेतृत्व करणार आहे. तर वर्षभरानंतर कमबॅक करणाऱ्या शुबमन गिल याला उपकर्णधार म्हणून सूत्र देण्यात आली आहेत. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना आणखी एक प्रश्न पडला आहे.
आशिय कप स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. अबुधाबी आणि दुबईतील स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सर्व सामने होणार आहेत. स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला. त्यानंतर आता भारतीय संघ यूएईला केव्हा रवाना होणार? याची उत्सूकता लागून आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी 4 किंवा 5 सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होऊ शकते. तसेच भारतीय संघ या स्पर्धेआधी कोणत्याही सराव शिबीरात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय खेळाडू आयपीएलच्या 18 व्या हंगामानंतर आशिया कप स्पर्धेत टी 20 सामने खेळणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या लोकप्रिय फॉर्मेटमध्ये चौकार-षटकारांची फटकेबाजी पाहायला मिळणार असल्याचं निश्चित आहे.
दरम्यान टीम इंडिया या स्पर्धेतून आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 च्या तयारीला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत भारतीय संघात संधी मिळालेल्या प्रत्येक खेळाडूचा सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर भारतीय संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात 10 सप्टेंबरपासून करणार आहे. टीम इंडिया पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध भिडणार आहे. दुसरा सामना हा 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. तर भारत साखळी फेरीतील आपला तिसरा आणि अंतिम सामना ओमान विरुद्ध खेळणार आहे.
निवड समितीने आशिया कप स्पर्धेसाठी भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर याला संधी दिली नाही. त्यामुळे चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच यशस्वी जैस्वाल याला मुख्य संघाऐवजी राखीव म्हणून संधी देण्यात आली आहे.