
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये दुसऱ्या टी 20i सामन्यात पराभूत झालेल्या टीम इंडियासमोर तिसर्या मॅचमध्ये कमबॅक करण्याचं आव्हान आहे. मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. तर दुसऱ्या सामन्यात भारताला फ्लॉप बॅटिंगमुळे सामना गमवावा लागला. त्यामुळे टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने बॅकफुटवर आहे. आता टीम इंडियाला मालिका जिंकायची असेल तर उर्वरित 3 सामने सलग जिंकण्याशिवाय पर्याय नाही. तसेच भारताने तिसरा सामना गमावला तर मालिका जिंकता येणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे गतविजेत्या टीम इंडियाला तिसर्या सामन्यात आपली खरी ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.
मेलबर्नमध्ये भारताच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा या जोडीने दम दाखवत भारताला 125 धावांपर्यंत पोहचवलं. ऑस्ट्रेलियाने हा सामना 13.2 ओव्हरमध्ये जिंकला. मात्र विशेष म्हणजे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला विजयी धावसंख्येपर्यंत 6 झटके दिले. त्यामुळे गोलंदाजांकडे बचाव करण्यासाठी आणखी 30-35 धावा असत्या तर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागू शकला असता.
हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव या दोघांनी दुसऱ्या सामन्यात बॅटिंगमध्ये काही प्रयोग केले जे पूर्णपणे फ्लॉप ठरले. सूर्याऐवजी संजू सॅमसन याला तिसऱ्या स्थानी पाठवण्यात आलं. संजूच्या बॅटिंग पोजिशनमध्ये बदल केल्याने त्याला काही करता आलं नाही. संजू 2 रन्स करुन आऊट झाला. आशिया कप स्पर्धेत धमाकेदार बॅटिंग करणाऱ्या तिलक वर्मा याला पाचव्या स्थानी बॅटिंगला पाठवण्यात आलं. तर टीम इंडिया अडचणीत असताना ऑलराउंडर शिवम दुबेला डावलून हर्षित राणा याला वर पाठवण्यात आलं. हर्षितने 35 धावा केल्या. मात्र हर्षित अपेक्षित फटकेबाजी करण्यात अपयशी ठरला.
ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकत भारताची मेलबर्नमधील मक्तेदारी मोडीत काढली. भारताचा मेलबर्नमधील हा पाचवा टी 20i सामना होता. भारताने त्याआधी 4 पैकी 2 सामने जिंकले होते. तर 1 सामन्यात पराभूत व्हावं लागलेलं. तर 1 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. टीम इंडियाचा या मैदानात दबदबा होता. मात्र भारताची या एका पराभवामुळे विजयाची मालिका खंडीत झाली.
दरम्यान ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा टी 20i सामना हा होबार्टमधील बेलेरिव ओव्हलमध्ये होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेप्रमाणे दुपारी पावणे 2 वाजता सुरुवात होईल.