T20 World Cup 2024 साठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, दोघांना डच्चू, कॅप्टन कोण?

Australia t20 world cup 2024 squad : टी 20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळालेल्या 2 खेळाडूंचं तब्बल 18 महिन्यांनी ऑस्ट्रेलिया टीमध्ये कमबॅक झालं आहे. पाहा ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपसाठी संघ कसा आहे?

T20 World Cup 2024 साठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, दोघांना डच्चू, कॅप्टन कोण?
mitchell marsh and pat cummins,
Image Credit source: Australia X account
| Updated on: May 01, 2024 | 4:29 PM

आगामी आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आपला संघ जाहीर करण्याची 1 मे ही अखेरची तारीख आहे. त्यामुळे आपली टीम जाहीर करण्याचा ओघ सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या वर्ल्ड कपसाठी मिचेल मार्श याला संधी दिली आहे. तर अनुभवी स्टीव्हन स्मिथ याला डच्चू दिली आहे. स्मिथला संधी न दिल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच जेक फ्रेसर मॅकगर्क या युवा फलंदाजाचाही समावेश करण्यात आलेला नाही. मॅकगर्कने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आपल्या विस्फोटक बॅटिंगने छाप सोडलीय.

ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीने ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याच्यावर विश्वास दाखवत टीममध्ये संधी दिली आहे. ग्रीनने अखेरचा टी 20 सामना हा नोव्हेंबर 2022 साली खेळला होता. ग्रीनने हा अखेरचा सामना टी 20 वर्ल्ड कपमध्येच खेळला होता. तेव्हापासून ग्रीन 18 महिने टीममधून बाहेर होता. ग्रीन व्यतिरिक्त एश्टन एगर यानेही टी 20 वर्ल्ड कप 2022 नंतर एकही सामना खेळला नाही.त्यामुळे आता हे दोघे मोठ्या स्पर्धेत कशी कामगिरी करतात, याकडे निवड समितीचं लक्ष असणार आहे.

मिचेल मार्शला मोठी जबाबदारी

मिचेल मार्शला टी 20 टीमचं पूर्णवेळ कर्णधार करण्यात आलंय. मिचेल जवळपास वर्षभरापासून ऑस्ट्रेलियाचं अंतरिम कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत होता. आता मिचेलकडे कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.

ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना केव्हा?

दरम्यान ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपसाठी बी ग्रुपमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 जून रोजी ओमान विरुद्ध करणार आहे. त्यानंतर 8 जून रोजी इंग्लंड आणि 11 जूनला नामिबिया विरुद्ध मैदानात उतरेल. तर 15 जूनला साखळी फेरीतील अखेरचा सामना हा स्कॉटलंड विरुद्ध खेळेल.

स्टीव्हन स्मिथला डच्चू

टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), टॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस, एश्टन एगर, पॅट कमिन्स, नॅथन एलिस, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, मॅथ्यू वेड आणि एडम जम्पा.