
टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच घरात 5 सामन्यांची मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर इंग्लंड अनेक सामने खेळणार आहे. मात्र क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे आगामी आणि प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेकडे आहे. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील या 5 सामन्यांच्या मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघातील पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. दोन्ही संघासाठी ॲशेस सीरिज ही कायमच प्रतिष्ठेची आणि मानाची राहिली आहे. या मालिकेला अजून बराच वेळ आहे. मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्ग्जाने इंग्लंडची लाज काढणारी भविष्यवाणी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनी ॲशेस सीरिजबाबत भविष्यवाणी केली आहे. मॅकग्राच्या भविष्याणीनुसार ऑस्ट्रेलिया ही मालिका एकतर्फी फरकाने जिंकेल. मॅकग्रानुसार ऑस्ट्रेलिया ही मालिका 5-0 अशा फरकाने जिंकेल.
“माझ्यासाठी भविष्यवाणी करणं खूप मोठी गोष्ट आहे. ऑस्ट्रेलिया ही मालिका 5-0 अशा फरकाने जिंकेल. मला ऑस्ट्रेलियावर पूर्ण विश्वास आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, नॅथन लायन आणि मिशेल स्टार्क हे घरच्या मैदानावर खूप धोकादायक ठरू शकतात. इंग्लंडसमोर या चौघांचं आव्हान असणार आहे. तसेच इंग्लंडचा ट्रॅक रेकॉर्ड इतका चांगला नाही. त्यामुळे इंग्लंड कसोटी सामन्यात विजयी होणार का, हे पाहण्यासारखं असेल”, असंही मॅकग्रा याने बीबीसी रेडियोवर म्हटंल.
इंग्लंडला 2015 नंतर आतापर्यंत एकदाही ॲशेस सीरिज जिंकता आली नाही. इंग्लंडने 2015 साली मायदेशात झालेली ॲशेस सीरिज जिंकली होती. त्यानंतर इंग्लंडला एकदाही ही मालिका उंचावता आली नाही.
“इंग्लंडला बॉलिंग लाइनअप आणखी भक्कम करण्याची गरज आहे. इंग्लंडच्या टॉप आणि मिडल ऑर्डरसमोर ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू नॅथन लायन याचं आव्हान असणार आहे. जो रुट आणि नॅथन लायन यांच्यातील लढत मोठी असेल. ही मालिका रुटसाठी फार महत्त्वाची असणार आहे. रुटने ऑस्ट्रेलियात काही खास केलेलं नाही. रुटला ऑस्ट्रेलियात एकही शतक करता आलेलं नाही. मात्र रुट सध्या जोरदार कामगिरी करत आहे”, असंही मॅकग्रा यांनी म्हटलं.
पहिला सामना, 21 ते 25 नोव्हेंबर, पर्थ
दूसरा सामना, 4 ते 8 डिसेंबर, गाबा
तिसरा सामना, 17 ते 21 डिसेंबर, ॲडलेड ओव्हल
चौथा सामना, 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा सामना, 4 ते 8 जानेवारी, सिडनी
“हॅरी ब्रूक याची बॅटिंग पाहणं मला फार आवडतं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना हॅरीला लवकरात लवकर आऊट करावं लागेल. इंग्लंडच्या सलामी जोडीने (बेन डकेट-झॅक क्रॉली) वेगाने धावा केल्या आहेत. ही मालिका फार थरारक असणार आहे”, असंही मॅकग्रा याने नमूद केलं.