बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांचा धक्कादायक निर्णय, केलं असं की…
पाकिस्तानात १४ मार्चपासून नॅशनल टी२० चॅम्पियन्शिप होत आहे. या स्पर्धेपूर्वी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी धक्का देणारा निर्णय घेतला. त्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान क्रिकेटची स्थिती दयनीय आहे. बांगलादेशसारखा दुबळा संघही पराभूत करून जात आहे. त्यात यजमानपद भूषवूणही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. असं असताना पाकिस्तानात होणाऱ्या नॅशनल टी२० चॅम्पियन्शिप स्पर्धेतून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी माघार घेतली आहे. तसेच वेगवान गोलंदाज नसीम शाह हा देखील या स्पर्धेत खेळणार नाही. बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि वेगवान गोलंदाज नसीम शाह यांना १६ मार्चला क्राइस्टचर्चमध्ये होणाऱ्या टी२० मालिकेतून बाहेर ठेवलं होतं. आता खेळाडूंनी माघार घेत धक्का दिला आहे. संघाची घोषणा करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर, रिझवान आणि नसीम सेंट्रल काँट्रॅक्ट असलेले खेळाडू आहेत. ते नॅशनल टी२० चॅम्पियन्शिपचा भाग असतील. पण आता तसं होताना दिसत नाही.
बाबर आझम आणि नसीम शाहने वर्कलोड आणि पुढच्या स्पर्धांचं कारण देत नॅशनल टी२० स्पर्धेतून माघार घेतली आहे. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान प्रीमियर लीग स्पर्धा एप्रिलमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे खेळाडू फ्रेंचायझी स्पर्धेला महत्त्व देत असल्याचं यामुळे अधोरेखित होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘राष्ट्रीय निवड समितीची धोरणं पाहता जर त्यांनी पीएसएलमध्ये चांगली कामगिरी केली तर ते राष्ट्रीय टी२० संघात परत येतील. तसेच सोशल मीडियावरही त्यांची चर्चा होईल.’ बाबर आझमने २०२० पासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेलं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फ्रेंचायझी लीगवर आहे.
नॅशनल टी२० कप २०२५ स्पर्धा १४ मार्चपासून सुरु होणार आहे. तसेच या महिन्याच्या शेवटपर्यंत असणार आहे. गतविजेता कराची व्हाईट्स या पर्वात इस्लामाबादशी सामना करेल. यावेळी या स्पर्धेत एकूण १८ संघ भाग घेणार आहेत. चार गटात याची विभागणी केली असून टॉप दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवतील. अबोटाबाद प्रदेश, एजेके प्रदेश, बहावलपूर प्रदेश, डेरा मुराद जमाली, फाटा प्रदेश, फैसलाबाद प्रदेश, हैदराबाद प्रदेश, इस्लामाबाद प्रदेश, कराची प्रदेश ब्लूज, कराची प्रदेश व्हाइट्स, लाहोर प्रदेश ब्लूज, लाहोर प्रदेश व्हाइट्स, लरकाना प्रदेश, मुलतान प्रदेश, पेशावर प्रदेश, क्वेट्टा प्रदेश हे संघ आहेत.