IPL 2026 : बांगलादेशने आयपीएल प्रसारणावर घातली बंदी, या देशातही स्पर्धा दाखवण्यास मनाई; जाणून घ्या

बांग्लादेश सरकारने आयपीएल स्पर्धा दाखवण्यावर बंदी घातली आहे. मुस्तफिझुर रहमानला आयपीएलमधून काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेशशिवाय आयपीएल स्पर्धा कोणत्या देशात दाखवली जात नाही? ते जाणून घ्या.

IPL 2026 : बांगलादेशने आयपीएल प्रसारणावर घातली बंदी, या देशातही स्पर्धा दाखवण्यास मनाई; जाणून घ्या
बांगलादेशने आयपीएल प्रसारणावर घातली बंदी, या देशातही स्पर्धा दाखवण्यास मनाई; जाणून घ्या
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jan 06, 2026 | 6:01 PM

आयपीएलमधून मुस्ताफिझुर रहमानला डच्चू दिल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि बांग्लादेश सरकारचा जळफळाट झाला आहे. बांग्लादेश सरकार भारताला दणका देण्याच्या हेतूने कठोर पावलं उचलत आहे. मुस्तफिझुरला बाहेर काढल्यानंतर बांगलादेशने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळण्यास नकार दिला आहे. बांगलादेशचे सर्व सामना श्रीलंकेत व्हावेत असं आयसीसीकडे निवेदन दिलं आहे. त्यावर अजून तरी काही निर्णय झालेला नाही. असं असताना आता बांग्लादेश सरकारने आयपीएल प्रसारणावरही बंदी घातली आहे. या स्पर्धेचं प्रसारण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग 120हून अधिक देशात होते. आयपीएल जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट स्पर्धा आहे. पण काही देशात या स्पर्धेच्या प्रसारणावर बंदी आहे. चला जाणून घेऊयात बांगलादेशव्यतिरिक्त कोणत्या देशात आयपीएल प्रसारण होत नाही.

पाकिस्तानातही आयपीएल प्रसारणावर बंदी

बांगलादेशने आयपीएलवर नुकतीच बंदी घातली आहे. दुसरीकडे, यापूर्वीच पाकिस्तानातही प्रसारण होत नाही. पाकिस्तानात आयपीएलवर बंदी आहे. मागच्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात टीव्ही चॅनेल किंवा प्लॅटफॉर्मवर स्पर्धा दाखवली जात नाही. पाकिस्तानात आयपीएल पाहण्यासाठी व्हीपीएनचा वापर होताना दिसतो. पण अधिकृतपणे आयपीएल दाखवलं जात नाही. दुसरीकडे, अफ्रिका खंडातील आणि मध्य आशियातील किंवा छोटी बेटं असलेल्या राष्ट्रांमध्ये क्रिकेट लोकप्रिय नाही. या ठिकाणीही आयपीएलचं प्रसारण केलं जात नाही. पण YuppTV सारखे प्लॅटफॉर्म 70पेक्षा जास्त देशात स्ट्रीमिंग देते. यात कॉन्टिनेंटल यूरोप, सेंट्रल साउथ अमेरिका, साउथ ईस्ट आशियातील काही भाग, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकासारखे देश आहेत. त्यामुळे खूपच कमी देश आहेत, जिथे आयपीएल प्रसारण होत नाही.

बांगलादेशमध्ये आयपीएल लोकप्रिय

बांगलादेशमध्ये आयपीएल खूप सारे चाहते आहेत. कारण बांगलादेशचे अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळले आहेत. क्रिकेटपटू अब्दूर रज्जाक, मोहम्मद अशरफुल, मशरफे मुर्तजा, लिट्टन दास, मुस्तफिझुर रहमान आयपीएलमध्ये खेळला आहे. बांगलादेशमध्ये टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून आयपीएलचं प्रसारण केलं जात होतं. पण त्यावर आता बांग्लादेश सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे बांगलादेशातील आयपीएल प्रेमींना आता ही स्पर्धा पाहता येणार नाही.