मुस्तफिझुर रहमान याला आयपीएलमधून डच्चू, तरीही केकेआर देणार पैसे? नियम जाणून घ्या
मुस्तफिझुर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर बराच वाद सुरु आहे. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. असं असताना मुस्तफिझुर रहमानला पैसे द्यावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. चला जाणून घेऊयात नेमका नियम काय आहे ते...

बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसात ज्या काही हिंसक घडामोडी घडत आहेत, त्याचे पडसाद भारतात उमटताना दिसत आहेत. आयपीएलमध्ये निवड झालेल्या बांगलादेशचा एकमेव खेळाडू मुस्तफिझुर रहमान याच्यावरही हे प्रकरण शेकलं आहे. भारतात बांगलादेशविरुद्ध असलेला रोष पाहता बीसीसीआयने त्याला डच्चू दिला आहे. खरं तर आयपीएल मिनी लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने 9.2 कोटींची बोली लावून संघात घेतलं होतं. पण बीसीसीआयच्या आदेशानंतर त्याला संघातून काढण्याशिवाय गत्यंतर उरलं नव्हतं. आता प्रश्न असा आहे की केकेआर मुस्तफिझुर रहमानला मोबदला देणार का? कारण मुस्तफिझुर रहमान आयपीएलमधून स्वत:हून बाहेर पडलेला नाही. तर त्याला विकत घेतल्यानंतर बाहेर काढलं आहे. त्यामुळे त्याला मोबदला मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. चला जाणून घेऊयात आयपीएलबाबत बीसीसीआयचा नियम..
मुस्तफिझुर रहमानला मोबदला मिळणार का?
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला कोणताही मोबदला मिळण्याची शक्यता नाही. जरी करार संपुष्टात आणण्यात त्याची कोणतीच भूमिका नव्हती. बीसीसीआयने त्याला बाहेर काढण्याचं कारणही स्पष्ट केलेलं नाही. यामुळे खेळाडूंच्या हक्काबाबत वादाला फोडणी मिळाली आहे. कारण त्याने स्वेच्छेने आयपीएलमधून माघार घेतलेली नाही. त्याने कोणतेही चुकीचे वर्तन केलं नाही, की त्यामुळे त्याची हकालपट्टी करावी लागली. असं सर्व शक्यता असूनही त्याला एक रूपयाही मिळणार नाही. आयपीएलच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितलं की, “सर्व आयपीएल खेळाडूंना विम्याचे संरक्षण दिले जाते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना, जर ते शिबिरात सामील झाल्यानंतर किंवा स्पर्धेदरम्यान दुखापत झाली तर फ्रँचायझी पैसे देते.”
मुस्तफिझुरचं प्रकरण सामान्य विमा नियमांतर्गत येत नाही. दुखापतीमुळे किंवा लीगमधील त्याच्या सहभागाशी संबंधित हे प्रकरण नाही. त्यामुळे केकेआर त्याला कोणतेही पैसे देण्यास बांधील नाही, हे स्पष्ट झालं आहे. आता मुस्तफिझुर रहमानकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. पण आयपीएल हे भारतीय कायद्यांतर्गत येते. त्यामुळे कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे डोकेदुखी आहे. इतकंच काय तर आयपीएल सहभागी होण्यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने दिलेली एनओसीदेखील मागे घेतली आहे. त्यामुळे मुस्तफिझुर रहमान न्यायालयाची पायरी चढणंही कठीण झालं आहे. त्यामुळे त्याला आता रिकामी हातीच राहावं लागणार हे स्पष्ट झालं आहे.
