बांगलादेशवर फिरकीपटू हरभजन सिंगने राग काढला, यायचं नसेल तर…
बांगलादेशमधील हिंसक स्थितीचे तीव्र पडसाद भारतात उमटले आहे. तिथल्या अत्याचाराची गंभीर दखल घेतली गेली आहे. त्यामुळेच बीसीसीआयने मुस्तफिझुर रहमान यांची आयपीएलमधून हकालपट्टी केली. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही जशाच तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. यावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपलं मत व्यक्त केलं आहे.

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यात कमालीचे ताणले गेले आहेत. क्रीडाविश्वावरही त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बांगलादेशातील हिंसाचारानंतर आयपीएल स्पर्धेत भाग घेतलेल्या मुस्तफिझुर रहमान काढण्याचे आदेश बीसीसीआयने दिले. त्यानंतर या वादाचा आणखी भडका उडाला आहे. बांगलादेशनेही बीसीसीआयने उचललेल्या पावलांवर तीव्र आक्षेप घेतला ठआहे. इतकंच काय तर आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा भारतात खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. यासाठी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला पत्र लिहून विनंतरी केली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील बांगलादेशचे सामना भारताबाहेर करण्याची विनंती केली आहे. पण यावर आयसीसीने उत्तर दिलेलं नाही. पण असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने बांगलादेशला खडे बोल सुनावले आहेत.
एएनआय वेबसाईटवरील माहितीनुसार हरभजन सिंगने सांगितलं की, ‘मागच्या काही दिवसात झालेल्या वेगवेगळ्या घटनांमुळे बांग्लादेश भारतात येऊ इच्छित नाही. बांगलादेशमध्ये जे काही घडलं ते वाईट आहे. आयसीसीने त्यांच्या मागणीचा विचार करायला हवा. आम्ही भारतात सर्वांचं स्वागत करतो. पण बांग्लादेश येथे येऊ इच्छित नाही. त्यांना येथे यायचं की नाही हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे.’ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीला लिहिलेल्या पत्रानंतर हरभजन सिंगची वक्तव्य समोर आलं आहे. बीसीबीने औपचारिकपणे आयसीसीला पत्र लिहून टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सर्व सामने इतरत्र हलवण्याची विनंती केली आहे. बांगलादेशच्या मते त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत करावेत. शनिवारी झालेल्या आपतकालीन बैठकीनंतर बीसीबीने हा निर्णय घेतला.
बीसीसीआयने कोलकाता नाइट रायडर्सला मुस्तफिझुर रहमानला रिलीज करण्याचे आदेश दिले होते. कोलकात्याने आयपीएल मिनी लिलाव 2026 मध्ये 9.2 कोटींची बोली लावत संघात घेतलं होतं. बांगलादेशी खेळाडूला मिळालेली आतापर्यंत सर्वात मोठी रक्कम होती. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, हा निर्णय बांगलादेशातील सध्याच्या घटनांनंतर घेतला गेला आहे. इतकंच काय तर केकेआरला बदली खेळाडूची परवानगीही दिली आहे.
बांगलादेशात गेल्या वर्षापासून राजकीय अस्थिरता आहे. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडावं लागलं होतं. त्या भारतात शरण आल्या आहेत. तेव्हापासून भारत आणि बांगलादेशचे संबंध ताणले गेले आहेत. दुसरीकडे, बांगलादेशमध्ये आयपीएल स्पर्धा टेलिकास्ट करण्यावर बंदी घातली गेली आहे.
