BAN vs AFG | बांगलादेशचा ‘करो या मरो’ सामन्यात विजय, अफगाणिस्तानवर 89 धावांनी मात
Asia Cup 2023 Bangladesh vs Afghanistan | बांगलादेश टीमने अफगाणिस्तानवर 89 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम राखलंय.

लाहोर | बांगलादेश क्रिकेट टीमने आशिया कप 2023 मधील विजयाचं खातं उघडलं आहे. बांगलादेशचा पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभव झाला होता. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या सामना बांगलादेशसाठी ‘करो या मरो’ असा होता. बांगलादेशने अखेर या सामन्यात अफगाणिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने या विजयासह आशिया कप 2023 स्पर्धेतील आव्हान कायम राखलं आहे. नजमूल हुसेन शांतो, मेहदी हसन मिराज आणि तास्किन अहमद या तिघांनी बांगलादेशच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
बांगलादेश विजयी अफगाणिस्तानला अपयश
बांगलादेशने अफगाणिस्तान विजयासाठी 335 धावांचं आव्हान दिलं. बांगलादेशनेही विजयी धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र प्रयत्न 89 धावांनी कमी पडले. बांगलादेशच्या बॉलिंगसमोर अफगाणिस्तान 245 धावांवर 44.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली. बांगलादेशकडून इब्राहीम झद्रान आणि कॅप्टन हशमतुल्ला शाहिदी या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. या दोघांशिवाय एकालाही विशेष योगदान देता आलं नाही.
इब्राहिम झद्रान याने 75 धावांची खेळी केली. तर हशमतुल्लाह शाहिदी याने 51 धावा केल्या. रहमत शाह याने 33 रन्सचं योगदान दिलं. राशिद खान याने 24 धावा जोडल्या. नजिबुल्लाह झद्रान याने 17 आणि गुलाबदिन नईब याने 15 धावा केल्या. फझलहक फारुकी 1 धावेवर नाबाद परतला. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशकडून तास्किन अहमद याने 4 विकेट्स घेतल्या. तर शोरिफूल इस्लाम याने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली. तर मेहदी हसन मिराज आणि हसन महमूद या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
बागंलादेशचा विजय
Bangladesh stay alive in #AsiaCup2023 with a big win over Afghanistan 💪
📝 #BANvAFG: https://t.co/MLdTKkAVCT pic.twitter.com/9wsemT9R92
— ICC (@ICC) September 3, 2023
त्याआधी बांगलादेशने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवातीनंतर झटपट 2 विकेट्स गमावले. मोहम्मद नईम 28 आणि तॉहिद हृदाय झिरोवर बाद झाला. त्यानंतर नजमुल होसेन शांतो आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी 191 बॉलमध्ये 194 धावांची विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान मेहदी हसन याने शतक झळकावलं. मात्र त्यानंतर मेहदी हसन रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे त्याला 112 धावा करुन माघारी परतला.
मेहदीनंतर नजमूल शांतो यानेही शतक ठोकलं. शांतोला शतकानंतर फार वेळ मैदानात घालवता आला नाही. शांतो 104 धावांवर दुर्देवी रन आऊट झाला. त्यानंतर बांगलादेशने झटपट विकेट्स टाकल्या. मुशफिकर रहमान याने 25, शाकिब अल हसन याने नॉट आऊट 32 आणि शमिम होसेन याने 11धावा केल्या. तर अफिफ होसेन 4 धावांवर नाबाद परतला. अफगाणिस्तानकडून मजीब उर रहमान आणि गुलाबदिन याने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
बांगलादेश प्लेईंग इलेव्हन | शाकिब अल हसन (कॅप्टन), मोहम्मद नईम, नजमूल हुसेन शांतो, तोहिद हृदाय, शमिम होसेन, मुशफिकर रहिम (विकेटीपर), अफीफ होसेन, मेहदी हसन मिराज, तास्किन अहमद, शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद
अफगाणिस्तान प्लेईंग इलेव्हन | हश्मतुल्लाह शाहिदी (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरुबाझ (विकेटकीपर), इब्राहीम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्लाह झद्रान, मोहम्मद नबी, गुलाबदीन नईब, करीम जनत, राशिद खान, फझलहक फारुकी आणि मुजीब उर रहमान.
