Icc Champions Trophy 2025 Final आधी दिग्गज एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त

Odi Cricket Retirement : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज फलंदाजाने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Icc Champions Trophy 2025 Final आधी दिग्गज एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त
Virat Kohli and Mushfiqur Rahim
Image Credit source: Bcci
| Updated on: Mar 06, 2025 | 12:26 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामना हा 9 मार्च रोजी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. मात्र अंतिम सामन्याच्या 4 दिवस क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान अवघ्या काही तासांमध्ये दुसऱ्या क्रिकेटपटूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. टीम इंडियाने  मंगळवारी 4 मार्च रोजी उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.  या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र कसोटी आणि टी 20i क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. स्मिथने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा झटका लागला. चाहते या धक्क्यातून सावरत नाहीत तोवर आता आणखी एका दिग्गजाने क्रिकेटला अलविदा केला आहे.

बांगलादेशचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन मुशफिकुर रहीम याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. मुशफिकुर रहीम याने निवृत्ती घेतल्याने एका युगाचा अंत झाल्याची भावना क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. बांगलादेशने टीम इंडियाला 2007 साली वनडे वर्ल्ड कप सामन्यात पराभूत करत स्पर्धेतून बाहेर केलं होतं. मुशफिकुर रहीम त्या संघाचा भाग होता. मुशफिकुरने त्या सामन्यात 192 या विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक आणि नाबाद 56 धावांची खेळी केली होती.

19 वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा

मुशफिकुर रहीमने बांगलादेशचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये जवळपास 2 दशकं प्रतिनिधित्व केलं. मुशफिकुरने 6 ऑगस्ट 2006 रोजी झिंबाब्वेविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. तर 27 फेब्रुवारी रोजी मुशफिकुरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तान विरुद्धचा सामना हा अखेरचा ठरला. हा सामना पावसामुळे टॉस न होताच रद्द करण्यात आला होता.

मुशफिकुर रहीम याचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा

मुशफिकुर रहीमची एकदिवसीय कारकीर्द

दरम्यान मुशफिकुर रहीम बांगलादेशसाठी 274 एकदिवसीय सामने खेळला. मुशफिकुरने त्यापैकी 256 डावांमध्ये 36.26 च्या सरासरीने 7 हजार 795 धावा केल्या. मुशफिकुरने या दरम्यान 100 षटकार आणि 617 चौकार लगावले. तसेच मुशफिकुरने 9 शतकं आणि 49 अर्धशतकं झळकावली. दरम्यान  मुशफिकुर याने याआधी 4 सप्टेंबर2022 रोजी टी 20I क्रिकेटला अलविदा केला होता.