
आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा पुढच्या वर्षी होणार आहे. या स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. दर वर्षांनी येणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद मिळवण्याचं स्वप्न प्रत्येक संघ उराशी बाळगून असतो. पण या स्पर्धेत पात्र ठरणं ही देखील मोठी बाब आहे. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी एकूण 14 संघ मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे 14 संघात जागा मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही. असाच फटका आता दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या संघाला बसण्याची शक्यता आहे. बांगलादेशने पाकिस्तानला वनडे मालिकेत 2-1 ने पराभूत केलं. या ऐतिहासिक मालिका विजयासह बांगलादेशने 2027 वनडे वर्ल्डकप पात्रता फेरीत मोठा उलटफेर केला आहे. ढाकाच्या शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये तिसर्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात बांगलादेशने 290 धावांचं आव्हान दिलं होतं. हा सामना बांगलादेशने 11 धावांनी जिंकला. त्यामुळे बांगलादेशच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा होणार आहे. त्याचा फटका दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या वेस्ट इंडिजला बसण्याची शक्यता आहे.
बांगलादेशचा संघ सध्या आयसीसी क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. आता नव्या क्रमवारीत बांगलादेशचा संघ दहाव्यावरून नवव्या स्थानी झेप घेईल. तर वेस्ट इंडिजचा संघ दहाव्या स्थानावर जाईल. त्यामुळे वेस्ट इंडिजचं टेन्शन वाढणार आहे. ही स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे येथे होणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना थेट तिकीट मिळालं आहे. तर उर्वरित 8 संघ आयसीसी वनडे क्रमवारीवरून ठरणार आहेत. म्हणजेच नवव्या स्थानापर्यंत संघ थेट पात्र ठरतील. कारण टॉप 8 मध्ये दक्षिण अफ्रिकेचा संघ असल्याने नवव्या स्थानावरील संघाला थेट तिकीट मिळेल. त्यानंतर दहाव्या क्रमांकापासून पुढच्या संघांना पात्रता फेरीत खेळावं लागेल.
वेस्ट इंडिजचं सर्वात मोठं दु:ख म्हणजे एकही सामना न खेळता क्रमवारी ढासळली आहे. आता पुढची वनडे मालिका सप्टेबंर ऑक्टोबर महिन्यात भारताविरुद्ध होण्याची शक्यता आहे. जर या मालिकेत चांगले गुण मिळवता आले नाही तर पात्रता फेरीत खेळण्याची वेळ येईल. मागच्या पर्वातही वेस्ट इंडिजचा संघ पात्र ठरू शकला नव्हता. त्यामुळे पात्रता फेरीत खेळावं लागलं. पण येथेही पदरी निराशा पडली. दुसरीकडे, बांगलादेशने या विजयासह 2027 वर्ल्डकप स्पर्धेत थेट एन्ट्री घेण्याचा दावा मजबूत केला आहे. आता थेट डिसेंबर महिन्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे.