
आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी 15 एप्रिलला टीम इंडियाच्या नव्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया लवकरच शेजारी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका ऑगस्ट महिन्यात खेळवण्यात येणार आहेत. दोन्ही मालिकेतील एकूण 6 सामने हे मीरपूर आणि चिटगाव येथे होणार आहे. बीसीसीआयने ही माहिती सोशल मीडियावरुन दिली. मात्र काही वेळेनंतर बीसीसीआयने ही सोशल मीडिया पोस्ट डिलिटही केली. त्यामुळे हा दौरा होणार की नाही? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
बीसीसीआयने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिलेल्या माहितीत, टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा 17 ऑगस्टला मीरपूरमधील शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्टला त्याच मैदानात दुसरा क्रिकेट सामना होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 23 ऑगस्टला चिटगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर 2 दिवसांनंतर टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे.
उभयसंघातील टी 20i मालिकेला 26 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाची बांगलादेशमध्ये जाऊन बांगलादेशविरुद्ध टी 20i मालिका खेळण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. चिटगावमध्ये पहिला सामना आयोजित करण्यात आला आहे. दुसरा सामना हा मीरपूरमध्ये 29 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. तर बांगलादेश दौऱ्याची सांगता ही 31 ऑग्सटला तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्याने होणार आहे.
दरम्यान बीसीसीआयने टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याच्या वेळापत्रकाची सोशल मीडिया पोस्ट काही वेळानंतर डिलिट केली. आता बीसीसीआयने ही पोस्ट डिलिट केल्याने हा दौराच रद्द करण्यात आला आहे की वेळापत्रकात बदल केला जाणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.