
प्रियांक पांचाळला पुन्हा एकदा कसोटी संघात स्थान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्यावेळी रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संघात स्थान मिळालं होतं. पण कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. प्रियांक पांचाळ गुजरातचा खेळाडू आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत.

केएस भरत आंध्र प्रदेशचा क्रिकेटपटू आहे. तो विकेटकिपर फलंदाज आहे. रणजीमध्ये त्रिशतक ठोकणारा तो पहिला विकेटकिपर फलंदाज आहे. मागच्या सीजनमध्ये केएस भरत RCB कडून खेळला होता. यंदाच्या सीजनमध्ये त्याला दिल्ली कॅपिटल्सने दोन कोटी रुपयांना विकत घेतलं.

ऑफ ब्रेक गोलंदाजी करणारा जयंत यादव अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. मूळचा दिल्लीचा असलेला जयंत हरयाणाकडून खेळतो. मागच्या काही वर्षात जयंत यादव भारतीय संघात आत-बाहेर होत राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेतील वनडे सीरीजमध्येही तो संघाचा भाग होता.

सौरभ कुमार हा भारताच्या कसोटी संघातील नवीन चेहरा आहे. 2017-18 च्या रणजी सीजनमध्ये त्याने उत्तर प्रदेशकडून सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. भारतासाठी नेट बॉलर राहिलेल्या सौरभ कुमारने आयपीएलमध्ये किंग्स पंजाब आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला आहे.

संजू सॅमसन पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. त्याला टी 20 संघात स्थान मिळालं आहे. याआधी 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो भारतीय संघाचा भाग होता. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. त्याला 14 कोटी रुपयांना विकत घेतलं.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी आवेश खानची भारतीय संघात निवड झाली होती. पण त्याला संधी मिळाली नाही. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये तो लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. त्याला 10 कोटीची बोली लावून विकत घेतलं. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 संघात त्याची निवड झाली आहे.