Video : सामना सुरु असताना कर्णधार रोहित शर्माने मागितली माफी, नेमकं मैदानात असं काय घडलं

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं होतं. अवघ्या ३५ धावांवर बांगलादेशच्यचा ५ विकेट गेल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीत इतिहास रचण्याची संधी होती. पण रोहित शर्माच्या चुकीमुळे सर्व आनंदावर विरजण पडलं. इतकंच काय त्याला लाईव्ह सामन्यात माफी मागावी लागली.

Video : सामना सुरु असताना कर्णधार रोहित शर्माने मागितली माफी, नेमकं मैदानात असं काय घडलं
| Updated on: Feb 20, 2025 | 6:33 PM

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. कारण बांगलादेशचा संपूर्ण संघ ४९.४ षटकात सर्व गडी गमवून २२८ धावा करू शकला. पण एक वेळ अशी होती की बांग्लादेश १०० धावा करेल की नाही याबाबत शंका होती. पण रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला खूपच महागात पडली. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियाचं १५२ धावांचं नुकसान झालं. या चुकीमुळे रोहित शर्माला सर्वांसमोर माफी मागण्याची वेळ आली. रोहित शर्माच्या या चुकीसाठी सोशल मीडियावर त्याच्या विरोधात रान उठलं आहे. बांगलादेशच्या डावात ९ व्या षटकात हा प्रकार घडला. अक्षर पटेल गोलंदाजीसाठी आला होता. त्याने आपल्या षटकात दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. त्यामुळे बांगलादेशचा संघ प्रचंड दबावात होता. अक्षर पटेलने हॅटट्रीकसाठी चेंडू टाकला आणि रोहित शर्माने मोठी चूक केली. यामुळे टीम इंडिया आणि अक्षर पटेलचं वैयक्तिक नुकसान झालं.

रोहित शर्माने हॅटट्रीक बॉलवर जाकेर अलीचा झेल सोडला. खरं तर हा एकदम सोपा झेल होता. जर रोहित शर्माने जाकेर अलीचा झेल पकडला असता तर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हॅटट्रीक घेणारा दुसरा गोलंदाज ठरला असता. इतकंच काय तर भारताचा पहिला गोलंदाज होण्याचा मान मिळाला असता. हा झेल सोडल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला आपल्या चुकीची उपरती झाली. त्याने जोर जोरात मैदानावर हात मारला आणि राग काढला. यानंतरही रोहित शर्माचा निराशा दूर झाली नाही. यासाठी तो वारंवार स्वत:ला दोष देत राहिला. षटक संपल्यानंतर रोहित सरळ अक्षर पटेलकडे गेला आणि दोन्ही हात जोडून आपल्या चुकीसाठी माफी मागितली. अक्षरने त्याला माफही केलं आणि पुढे गेले.

या सामन्यात रोहित शर्माच नाही तर इतर खेळाडूंनीही माती केली. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनीही गचाळ क्षेत्ररक्षण केलं. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर तौहीद हृदोयचा सोपा झेल हार्दिक पांड्याने सोडला. तर जाकेर अलीला या सामन्यात दुसरं जीवदान मिळालं. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत करण्याची मोठी संधी केएल राहुलकडे होती. मात्र त्याने ही संधी घालवली. एकंदरीत या चुकांमुळे बांगलादेशचा संघ २२८ धावांपर्यंत मजल मारू शकला.