महायुतीचं टेन्शन वाढलं! संभाजी भिडे यांचे धारकरी निवडणुकीच्या रिंगणात, भाजपा-शिंदे गटाला भरली धडकी
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच आता संभाजी भिडे यांचे धारकरीही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Sangli Municipal Corporation Election : सध्या राज्यात महापालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक स्थानिक बड्या नेत्यांनी आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश केला आहे. एकूण 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. सांगली जिल्ह्यातील महापालिकेच्या निवडणुकीकडेही आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकीत संभाजी भिडे गुरूज यांच्या श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी उतरले आहेत. भाजपाकडे उमेदवारी मागूनही फक्त एकच जागा मिळाल्याने आता शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरवले आहे.
भाजपाने उमेदवारी न दिल्याने नाराजी
मिळालेल्या माहितीनुसार सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आता हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भाजपाकडे धारकऱ्यांसाठी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांना एकच जागा दिल्याने धारकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हिंदुत्त्व, लव्ह जिहाद, गोरक्षा यांसह अनेक मुद्द्यांवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी काम करतात. परंतु भाजपाने समाधानकारक जागा दिल्या नाहीत. त्यामुळेच आता धारकरी या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल
आज (29 डिसेंबर) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी राहुल बोळाज यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल बोळाज यांनी प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते रॅलीचे उद्घाटन केले. तसेच मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने आमचा विचार केला नसला तरी आम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत, असे यावेळी राहुल बोळाज आणि धारकरी सुरेंद्र बोळाज यांनी सांगितले आहे.
सांगलीतलं राजकारण बदलणार?
दरम्यान, सांगलीमध्ये संभाजी भिडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या शिवप्रतिष्ठानचे काम करणाऱ्या तरुणांची संख्या बरीच आहे. असे असताना आता सांगलीत संभाजी भिडे यांचे धारकरीच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तिथे राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. धारकरी रिंगणात उतरल्याने भाजपा आणि शिंदे गटाची मतं फुटू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
