
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. गेल्या वर्षभरापासून या स्पर्धेची तयारी सुरु होती. हायब्रिड मॉडेलवर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान हे संघही भिडणार आहेत. कारण हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. गट अ मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत. तर गट ब मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. दोन्ही गटातून साखळी फेरीत टॉपला असलेले संघ उपांत्य फेरी गाठतील. पण टॉप 2 मधील दोन्ही संघांचे समान गुण असतील तर एक नंबरचा संघ कोणता? दुसरीकडे, तीन संघांना समान गुण मिळाले तर उपांत्य फेरीचं तिकीट कोणाला मिळणार? इतकंच कायतर उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला किंवा टाय झाला तर हा प्रश्न कसा सुटणार? असा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढे मिळतील.
साखळी फेरीत प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. अशा स्थितीत तीन संघांना समान गुण मिळण्याची शक्यता आहे. एक सामना जिंकल्यानंतर दोन गुण मिळतील. तर सामना टाय झाल्यास प्रत्येकी एक गुण दिला जाईल. जो संघ सर्वाधिक विजय मिळवेल तो संघ त्या गटात टॉपला असेल. पण गटात तीन संघ प्रत्येकी दोन सामने जिंकले तर समान गुण होतील. प्रत्येकाच्या वाटेला 4 गुण असतील. अशा स्थितीत नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे. त्या आधारावर उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. त्यामुळे भारताला सामना जिंकून चालणार नाही तर नेट रनरेटवरही काम करावं लागणार आहे.
उपांत्य फेरीत गट अ आणि गट ब मधील संघ आमनेसामने असतील. गट अ मधील टॉपचा संघ ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी सामना करेल. तर ब गटातील अव्वल संघ अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी लढत करेल. पण उपांत्य फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. पण सुपर ओव्हर झाली नाही आणि पाऊस किंवा अन्य कारणाने सामना रद्द झाला तर ग्रुपमध्ये टॉपला असलेला संघाल अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नाही. अंतिम फेरीचा सामना भारताच्या स्थितीवर अवलंबून आहे. भारताने अंतिम फेरी गाठली तर 9 मार्चला सामना दुबईत होईल. अन्यथा लाहोरमध्ये सामना होईल. अंतिम सामन्यासाठी 10 मार्च हा दिवस राखीव ठेवला आहे.