पृथ्वी शॉने टीम इंडियाचं दार ठोठावलं, रणजी ट्रॉफीत द्विशतकासह नोंदवला विक्रम

Chandigarh vs Maharashtra: पृथ्वी गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे. आता त्याने द्विशतकी खेळी करत टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे.

पृथ्वी शॉने टीम इंडियाचं दार ठोठावलं, रणजी ट्रॉफीत द्विशतकासह नोंदवला विक्रम
पृथ्वी शॉने टीम इंडियाचं दार ठोठावलं, रणजी ट्रॉफीत द्विशतकासह नोंदवला विक्रम
Image Credit source: बीसीसीआय स्क्रीनशॉट
| Updated on: Oct 27, 2025 | 6:16 PM

पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत येत आहे. वाद काही त्याचा पाठलाग सोडताना दिसत नाही. पृथ्वी शॉने नुकतीच मुंबई क्रिकेट असोसिएशनला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र संघाची सोबत केली होती. महाराष्ट्र संघाकडून खेळताना पृथ्वी शॉचं हे पहिलंच रणजी पर्व आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. ओपनिंगला येत 141 चेंडूत द्विशतकी खेळी केली. महाराष्ट्रासाठी त्याचं पहिलं फर्स्ट क्लास शतक आहे. चंदीगडविरुद्धच्या सामन्यात पृथ्वी शॉने 222 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 29 चौकार आणि 5 षटकार मारले. पृथ्वी शॉने 142 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. टी20 क्रिकेटच्या हिशेबानेही हा स्ट्राईक रेट चांगला आहे. पृथ्वी शॉ रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात फेल गेला होता. तर चंदीगडविरुद्धच्या पहिल्या डावातही फक्त 8 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात त्याने चंदीगडच्या गोलंदाजांची धुलाई केली.

पृथ्वी शॉचं हे द्विशतक महाराष्ट्र संघासाठी खास आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही फलंदाजाने इतक्या वेगाने द्विशतक ठोकलेलं नाही. रणजी ट्रॉफीच्या एलीट ग्रुपच्या इतिहासातील दुसरं वेगवान द्विशतक आहे. यासह पृथ्वी शॉने राहुल सिंहचा विक्रम मोडीत काढला. त्याने 2023-2024 मध्ये 143 चेंडूत द्विशतक ठोकलं होतं. पृथ्वी शॉने आता 141 चेंडूत ही कामगिरी केली. पृथ्वी शॉच्या दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या स्थानावर रवी शास्त्री आहेत. त्याने 1984-85 मध्ये 123 चेंडूत द्विशतक ठोकलं होतं.

पृथ्वी शॉच्या द्विशतकी खेळीनंतर महाराष्ट्र संघाने दुसरा डाव 359 धावांवर डाव घोषित केला. तसेच चंदीगडसमोर विजयासाठी 464 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. महाराष्ट्रने पहिल्या डावात 313 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चंदीगडचा संघ 209 धावांवर सर्व बाद झाला. त्यामुळे महाराष्ट्र संघाला 104 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ व्यतिरिक्त सिद्धेश वीरने 62, ऋतुराज गायकवाडने 36 आणि अर्शीन कुलकर्णीने 31 धावा केल्या. आता दुसऱ्या डावात महाराष्ट्राचे गोलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, आयपीएल मिनी लिलावापूर्वी पृथ्वी शॉची ही खेळी महत्त्वाची ठरणार आहे.