GT vs CSK : डेवाल्ड ब्रेव्हीसची वादळी खेळी, कॉनव्हेचं अर्धशतक, गुजरातसमोर 231 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?

Gujarat Titans vs Chennai Super Kings 1st Innings Highlights : चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी गुजरात टायटन्स विरुद्ध 18 व्या मोसमातील शेवटच्या सामन्यात झंझावाती खेळी केली. त्यामुळे चेन्नईला 230 धावांपर्यंत मजल मारता आली.

GT vs CSK : डेवाल्ड ब्रेव्हीसची वादळी खेळी, कॉनव्हेचं अर्धशतक, गुजरातसमोर 231 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
Devon Convey and Dewald Brevis Csk
Image Credit source: CSK AND IPL X Account
| Updated on: May 25, 2025 | 6:19 PM

आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉनव्हे या सलामी जोडीने केलेली वादळी सुरुवात, मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी केलेली फटकेबाजी आणि डेवाल्ड ब्रेव्हीस याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 मोहिमेतील शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 231 धावांचं अवघड आव्हान ठेवलं आहे. सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 230 रन्स केल्या. त्यामुळे टॉप 2 च्या शर्यतीत असलेल्या गुजरातचं टेन्शन वाढलं आहे. आता गुजरात हे अवघड आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरतं की चेन्नई या मोहिमेचा शेवट विजयाने करते? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

चेन्नईची बॅटिंग

आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉनव्हे या सलामी जोडीने चेन्नईला कडक सुरुवात मिळवून दिली. सलामी जोडीने 44 धावांची भागीदारी केली. आयुषचं यात सर्वाधिक योगदान राहिलं. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात आयुष आऊट झाला. आयुषने 17 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 34 रन्स केल्या. त्यानंतर उर्विल पटेल आणि कॉनव्हे या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. चेन्नईसाठी या दोघांनी 63 धावांची भागीदारी केली. साई किशोर याने ही सेट जोडी फोडली. साईने उर्विलला आऊट केलं. उर्विललने 35 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या.

डेव्हॉन आणि शिवम दुबेने तिसऱ्या विकेटसाठी 37 रन्स जोडल्या. शिवम 8 बॉलमध्ये 2 सिक्ससह 17 रन्स केल्या. शिवमनंतर काही मिनिटांनी डेव्हॉनही आऊट झाला. डेव्हॉनने 35 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 52 रन्स केल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या जोडीने टॉप गिअर टाकला.

डेवाल्डने चौफेर फटकेबाजी करत गुजरातच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. तसेच जडेजाना दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. डेवाल्ड आणि जडेजा जोडीने पाचव्या विकेटसाठी 74 रन्सची पार्टनरशीप केली. ब्रेव्हीस डावातील शेवटच्या बॉलवर आऊट झाला. ब्रेव्हीसने 5 सिक्स आणि 4 फोरसह 23 बॉलमध्ये 57 रन्स केल्या. तर रवींद्र जडेजा याने 1 सिक्स आणि 1 फोरच्या मदतीने नॉट आऊट 21 रन्स केल्या. गुजरातसाठी गेराल्ड कोएत्झी याने दोघांना आऊट केलं. तर साई किशोर, राशिद खान आणि शाहरुख खान या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

गुजरातसमोर 231 धावांचं आव्हान

गुजरात टॉप 2 च्या शर्यतीत

दरम्यान गुजरात टॉप 2 च्या शर्यतीत असल्याने चेन्नई विरुद्धचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. प्लेऑफसाठी 4 संघ ठरले आहेत. मात्र पहिल्या 2 स्थानांसाठी चुरस अजूनही कायम आहे. टॉप 2 मध्ये असणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहचण्याची संधी अधिक असते. त्यामुळे टॉप 2 साठी ही चुरस पाहायला मिळत आहे. गुजरातने हा सामना जिंकला तर ते टॉप 2 मध्ये कायम राहतील, हे स्पष्ट आहे. मात्र चेन्नई जाता जाता गुजरातचा गेम करणार का? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.