श्रीलंका विरूद्धच्या गॉल टेस्ट सामन्यात देवदत्त पडिक्कल दावा मजबूत, सराव सामन्यात दमदार शतक ठोकलं
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी टीम इंडियाला साई सुदर्शनच्या रुपाने मोठा धक्का बसला आहे. पण देवदत्त पडिक्कलच्या रुपाने एक दिलासा मिळाला आहे.

कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ श्रीलंका इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सामन्यातून भारतीय संघाला अभ्यास कसा झाला आहे याची चाचपणी करता येणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंका इलेव्हनच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या दिवशी श्रीलंकेने 8 गडी गमवून 363 धावा केल्या आणि डाव घोषित केला. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वालच्या रुपाने टीम इंडियाला धक्का बसला. त्याला खातंही खोलता आलं नाही. संघाची नाजूक स्थिती असताना देवदत्त पडिक्कल मैदानात उतरला आणि त्याने कर्णधार केएल राहुलसह डाव सावरला. दोघांनी मिळून 138 चेंडूंचा सामना केला आणि 96 धावा केल्या. केएल राहुल 40 धावा करून बाद झाला. त्यानंतरही देवदत्त पडिक्कलने डाव सावरला. त्याने 121 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या आणि रिटायर्ट हर्ट झाला.
देवदत्त पडिक्कल तिसऱ्या स्थानावर खेळणार!
देवदत्त पडिक्कल शतकी खेळी करून रिटायर्ट हर्ट झाला. त्याने शतकासह तिसऱ्या क्रमांकावर दावा ठोकला आहे. साई सुदर्शन या स्पर्धेला मुकल्यानंतर त्याचा दावा आणखी पक्का झाला आहे. गॉल कसोटी सामन्यात पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार हे निश्चित झालं आहे. दरम्यान, ध्रुव जुरेलच्या रुपाने तिसऱ्या क्रमांकासाठी एक पर्याय आहे. पण देवदत्त पडिक्कलने शतक ठोकून आपण या स्थानावर खेळण्यास योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे. पडिक्कलने आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले असून तीन डावात 30 च्या सरासरीने 90 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
Devdutt Padikkal made the most of his time in the middle, bringing up a composed century in the warm-up. 💯
The timing was sweet, the strokeplay even sweeter. 👌
Watch Day 2 of SLC XI vs #TeamIndia LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork… pic.twitter.com/Si0Pdoa2yB
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 8, 2026
ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल फेल
देवदत्त पडिक्कल रिटायर्ड हर्ट झाला आणि ऋषभ पंत मैदानात आला. पण त्याचा खेळ फार काळ टिकू शकला नाही. ऋषभ पंत फक्त 5 चेंडूंचा सामना केला आणि 2 धावा करून बाद झाला. इतकंच काय तर ध्रुव जुरेलही काही खास करू शकला नाही. त्यानेही 9 चेंडूंचा सामना केला आणि 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी देवदत्त पडिक्कल हाच योग्य पर्याय ठरणार आहे.