दिनेश कार्तिकने महेंद्रसिंह धोनीबाबत केली गंभीर चूक! आता जाहीर माफी मागत म्हणाला…
क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला महेंद्रसिंह धोनी प्रकरणी जाहीर मागण्याची वेळ आली आहे. दिनेश कार्तिकने जाहीरपणे आपल्या चुकीची कबुली दिली आहे. तसेच चूक सुधारत माफ करा असंही जाहीरपणे सांगितलं आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

भारतीय संघाचा माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक सध्या दक्षिण अफ्रिकेत टी20 लीग खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. असं असताना त्याने केलेली एक चूक चांगलीच भोवली आहे. क्रिकबझच्या एका कार्यक्रमात दिनेश कार्तिकने तिन्ही फॉर्मेटसाठी ऑल टाईम भारतीय संघाची निवड केली होती. या संघात भारताचा यशस्वी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीचं नाव नव्हतं. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र त्याला चूक लक्षात येताच त्याने सर्वांची जाहीरपणे माफी मागितली. दिनेश कार्तिकने माफी मागितल्यानंतर सांगितलं की, मला माझी चूक लक्षात आली आहे. कार्तिकने सांगितलं की, ‘भावांनो, मोठी चूक झाली. खरंच ही एक चूक होती. जेव्हा कार्यक्रम समोर आला. तेव्हा मला चूक झाल्याचं लक्षात आलं.’
दिनेश कार्तिकने सांगितलं की, ‘मी माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये विकेटकीपर निवडायला विसरलो. राहुल द्रविड संघात असल्याने मी पार्टटाईम विकेटकीपर ठेवल्याचं सगळ्यांना वाटलं. खरंच मी राहुल द्रविडला विकेटकीपर म्हणून घेतलं नव्हतं. मी स्वत: विकेटकीपर असल्याने संघात विकेटकीपर ठेवायला विसरलो. ही खूप मोठी चूक आहे.’ आपली चूक सुधारत दिनेश कार्तिकने सांगितलं की, धोनी क्रिकेटविश्वातील एक मोठा खेळाडू आहे. तसेच सर्व फॉर्मेटमध्ये महेंद्रसिंह धोनी त्याच्या टीममध्ये सातव्या क्रमांकावर राहील.
दिनेश कार्तिकने निवडलेली ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन : विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, राहुल द्रविड़, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, युवराज सिंग, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबले, जसप्रीत बुमराह, जहीर खान. 12वा खेळाडू: हरभजन सिंह.
दिनेश कार्तिकने महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर स्थान दिलं तर संघातून कोणाला काढणार हा देखील प्रश्न आहे. अनेकांनी प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला बसवणार असा प्रतिप्रश्न विचारला आहे. दिनेश कार्तिकने निवडलेल्या प्लेइंग 11 मध्ये रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर आहे. त्यालाच बेंचवर बसवू शकतो असं दिसत आहे. महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार आहे. दुसरीकडे, कर्णधारपदाची धुराही महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर देणार असल्याचं जाहीरपणे सांगितलं. दिनेश कार्तिकच्या माफीनाम्यानंतर धोनीच्या चाहत्यांचा राग शमणार का? हा प्रश्न आहे.
