ENG vs IND : स्मृती मंधानाचं वादळी शतक, हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड ब्रेक

Smriti Mandhana Break Harmanpreet kaur Record : सांगलीच्या स्मृती मंधाना हीने इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी करत हरमनप्रीत कौर हीचा विक्रम उद्धवस्त केला आहे.

ENG vs IND : स्मृती मंधानाचं वादळी शतक, हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड ब्रेक
Smriti Mandhana 1st T20i Century
Image Credit source: Bcci Women x Account
| Updated on: Jun 29, 2025 | 1:11 AM

वूमन्स टीम इंडियाने स्मृती मंधानाच्या नेतृत्वात इंग्लंडवर 97 धावांच्या ऐतिहासिक फरकाने मात करत टी 20i मालिकेची विजयाने सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील पहिला सामना हा 28 जून रोजी ट्रेंटब्रिज,नॉटिंघम येथे खेळवण्यात आला. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 211 धावांचं अवघड आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. इंग्लंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. भारताने इंग्लंडला 14.5 ओव्हरमध्ये 113 रन्सवर ऑलआऊट केलं आणि 97 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंड वूमन्स टीमचा हा टी 20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.

भारताच्या विजयात स्मृती मंधाना हीच्यानंतर श्री चरणी हीने प्रमुख भूमिका बजावली. श्री चरणी हीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अमनज्योत कौर आणि अरुंधती रेड्डी या दोघींनी 1-1 विकेट मिळवली.

तर त्याआधी भारतीय संघाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 210 धावा केल्या. या 210 पैकी निम्म्या जास्त धावा एकट्या कर्णधार स्मृती मंधाना हीने केल्या. स्मृतीने इंग्लंड विरुद्ध धमाकेदार शतक केलं. स्मृतीने 62 चेंडूत 180.65 च्या स्ट्राईक रेटने 112 धावा केल्या. स्मृतीने या खेळीत 3 सिक्स आणि 15 फोर लगावले. स्मृतीने या खेळीसह इतिहास घडवला. स्मृतीचं टी 20i क्रिकेटमधील हे पहिलंवहिलं शतक ठरलं. स्मृती यासह टेस्ट, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला फलंदाज ठरली. तसेच स्मृतीने या शतकासह भारताची अनुभवी फलंदाज हरमनप्रीत कौर हीचा रेकॉर्ड ब्रेक केला.

स्मृतीची अविस्मरणीय कामगिरी

मिताली राजसह हरमनप्रीत कौरचा रेकॉर्ड ब्रेक

स्मृतीने 88 धावा करताच आधी स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. स्मृतीची याआधी 87 ही टी 20i क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती. त्यानंतर स्मृतीने 98 धावा करताच माजी कर्णधार मिताली राज हीचा नाबाद 97 धावांचा विक्रम मोडीत काढला. तर 104 धावा करताच स्मृतीने इतिहास घडवला. स्मृती टी 20i क्रिकेटमध्ये भारतासाठी एका डावात सर्वोच्च धावासंख्या करणारी पहिली महिला फलंदाज ठरली. स्मृतीने हरमनप्रीत कौर हीचा 103 रन्सचा रेकॉर्ड ब्रेक केला. हरमनप्रीतने 2018 साली न्यूझीलंड विरुद्ध प्रोव्हीडन्समध्ये ही खेळी केली होती. त्यानंतर आता हा विक्रम स्मृतीच्या नावावर झाला आहे.