ENG vs IND Test : एकूण 137 कसोटी सामने, सर्वाधिक कुणी जिंकले?

England vs India Head To Head Test Stats : इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आतापर्यंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 137 सामने खेळवण्यात आले आहेत. दोघांपैकी सरस टीम कोण? पाहा आकडे

ENG vs IND Test : एकूण 137 कसोटी सामने, सर्वाधिक कुणी जिंकले?
Ben Stokes and Shubman Gill ENG vs IND
Image Credit source: Bcci
| Updated on: Jul 02, 2025 | 1:11 AM

यजमान इंग्लंड क्रिकेट टीम 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंडने पाहुण्या भारतीय संघावर लीड्समध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मात केली. इंग्लंडने विजयासाठी मिळालेलं 371 धावांचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा 2 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचं हा सामना जिंकून पहिल्या पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे.

उभयंसघातील दुसरा सामना हा बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनमध्ये खेळवण्यात येणार आहे. भारताला या मैदानात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे भारतावर मालिकेत बरोबरी करण्यासह इंग्लंडला सलग दुसरा विजय मिळवण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान आहे. या निमित्ताने इंग्लंड विरुद्ध इंडिया या दोघांपैकी टेस्टमध्ये कोण सरस राहिलं आहे? हे आकड्यांच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंड भारतावर वरचढ

इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 137 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. इंग्लंडने या 137 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. इंग्लंडने टीम इंडियाचा 52 सामन्यांमध्ये पराभव केला आहे. तर टीम इंडियाने 35 सामन्यांमध्ये पलटवार करत इंग्लंडचा धुव्वा उडवला आहे. तर दोन्ही संघातील 50 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारताची बर्मिंगहॅममधील कामगिरी

दरम्यान भारताला आतापर्यंत बर्मिंगहॅममध्ये विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. भारताने या मैदानात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळले आहेत. भारताला 8 पैकी 7 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. तर एकमेव सामना हा अनिर्णित राखण्यात यश आलं आहे. त्यामुळे शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारतीय संघ गेल्या अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवत या मैदानात पहिला विजय मिळवणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडकडून प्लेइंग ईलेव्हन जाहीर

दरम्यान इंग्लंडने दुसऱ्या सामन्याच्या 48 तासांआधी 30 जून रोजी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली. इंग्लंडने 15 सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश केला होता. त्यामुळे जोफ्राची प्लेइंग ईलेव्हनमधील जागा फिक्स समजली जात होती. मात्र जोफ्राला कौटुंबिक कारणामुळे संघाची साथ सोडावी लागली. त्यामुळे जोफ्राचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही.त्यामुळे इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे टीम इंडियासमोर इंग्लंडच्या पहिल्याच सामन्यातील त्याच 11 खेळाडूंचं आव्हान असणार आहे.