
टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टे्स्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या पहिल्या मालिकेत अपेक्षित सुरुवात करण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात पराभव झाला. इंग्लंडने टीम इंडियावर 5 विकेट्सने पराभव करत विजयी सलामी दिली. त्यानंतर आता उभयसंघातील दुसरा सामना हा 2 ते 6 जुलै बर्मिंगहॅममधील ऐतिहासिक एजबेस्टन मैदानात आयोजित करण्यात आला आहे. टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकल्यास भारतीय संघांचा विश्वास वाढेल. तसेच मालिकेतही 1-1 ने बरोबरी होईल. मात्र टीम इंडियाची बर्मिंगहॅममधील आकडेवारी ही चिंताजनक आहे. टीम इंडियाची या मैदानातील कामगिरी कॅप्टन शुबमन गिल याच्यासाठी डोकेदुखी वाढवणारी आहे.
टीम इंडियाने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानात आतापर्यंत एकूण 8 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाला या मैदानात एकही सामना जिंकता आलेला नाही. भारताचा या मैदानात 8 पैकी 7 सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना हा अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे कॅप्टन शुबमनला या सामन्यासाठी सहकाऱ्यांसह रणनिती आखावी लागेल.
टीम इंडियाने एजबेस्टनमधील या मैदानात अखेरचा कसोटी सामना हा 2022 साली खेळला होता. तेव्हा जसप्रीत बुमराह याने भारताचं नेतृत्व केलं होतं. भारताला बुमराहच्या नेतृत्वात पराभवाचा सामना करावा लागला होता. इंग्लंडने तो सामना 7 विकेट्सने जिंकला होता.
टीम इंडियासमोर दुसऱ्या कसोटीत लीड्समधील पहिल्या टेस्टमध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाने लीड्समध्ये 7-8 कॅच सोडल्या होत्या. टीम इंडियाला या चुकांचा फटका बसला. या कॅचेस सोडल्याने भारताला 5 शतकं करुनही पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत पराभवासाठी कारणीभूत ठरणाऱ्या चुका टाळण्याचं भारतीय संघासमोर असेल.
दरम्यान इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी 6 दिवसांआधीच 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंडच्या संघात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं कमबॅक झालं आहे. आर्चरचं कसोटी संघात 4 वर्षांनी पुनरागमन झालंय. त्यामुळे आर्चरचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश निश्चित समजला जात आहे.