ENG vs IND Odi Series : विराट कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी कशी? जाणून घ्या

England vs India Odi Series 2026 : विराट कोहली याला दुखापतीमुळे अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळता आलं नाही. मात्र आता विराट इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी फिट झाला आहे. त्यामुळे विराट इंग्लंड विरुद्ध खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे.

ENG vs IND Odi Series : विराट कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी कशी? जाणून घ्या
Virat Kohli Indian Cricket Team
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 22, 2026 | 11:47 PM

बीसीसीआय निवड समितीने रविवारी 21 जून रोजी इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या मालिकेतून एकदिवसीय संघात अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचं कमबॅक झालं. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत नेतृत्व करणार आहे. श्रेयसची कर्णधार म्हणून ही दुसरीच मालिका असणार आहे. तर टीम इंडियाची इंग्लंड दौऱ्याची सांगता ही एकदिवसीय मालिकेने होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. या मालिकेनिमित्ताने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याची इंग्लंडमध्ये कशी कामगिरी राहिली आहे हे जाणून घेऊयात.

विराटचे इंग्लंडमधील आकडे

विराट कोहली एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीत आतापर्यंत इंग्लंडमध्ये एकूण 33 सामने खेळला आहे. विराटने या 33 सामन्यांत 50 पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत. विराटने 51.88 च्या सरासरीने 1 हजार 349 धावा केल्या आहेत. विराटने इंग्लंडमध्ये 1 शतक आणि 12 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच विराट इंग्लंडमध्ये 2 वेळा अपयशी ठरला आहे. विराट 2 वेळा भोपळा न फोडता माघारी परतला आहे.

विराट कोहली याला रोखणं अवघड

विराट गेल्या काही सामन्यांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने खोऱ्याने धावा करत आहे. त्यामुळे विराटला रोखणं इंग्लंडसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. विराटने गेल्या 7 एकदिवसीय सामन्यांत 3 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच विराटने 2026 वर्षात 80 च्या सरासरीने 240 धावा केल्या आहेत. तर विराटने 2025 मध्ये 65.1 च्या सरासरीने 651 धावा केल्या आहेत.

इंग्लंड-इंडिया वनडे मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 जुलै, बर्मिंगघम

दुसरा सामना, 16 जुलै, कार्डीफ

तिसरा आणि अंतिम सामना, 19 जुलै, लंडन

टीम इंडियाची इंग्लंडमधील कामगिरी

दरम्यान इंग्लंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 77 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 77 पैकी 22 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने भारताला 43 सामन्यांमध्ये पराभूत केलं आहे. उभयसंघातील 10 सामन्यांचा निकाल लागला नाही. तर 2 सामने बरोबरीत सुटले.

Follow Us