
मुंबई | दक्षिण आफ्रिका टीमने इतिहास रचला आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका टीमने इंग्लंडवर 229 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला विजयासाठी 400 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगसमोर इंग्लंडचे फलंदाज फुस्स ठरले. इंग्लंडला 22 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 170 धावाच करता आल्या. तर रीस टोपली याला दुखापत झाल्याने तो खेळायला येऊ शकला नाही. इंग्लंडचा वनडे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. दक्षिण आफ्रिका टीमला या मोठ्या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये तगडा फायदा झाला आहे.
इंग्लंडकडून मार्क वूड याने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. तर गस ऍटकिन्सन याने 35 धावांचं योगदान दिलं. या जोडीने नवव्या विकेटसाठी तोडफोड बॅटिंग करत 70 धावांची भागीदारी केली. या दोघांनी अखेरीस केलेल्या भागीदारीमुळे विजयातील अंतर हे आणखी कमी होण्यास मदत झाली. अन्यथा दक्षिण आफ्रिकेला नेट रनरेटमध्ये आणखी फायदा झाला असता.
वूड आणि ऍटकिन्सन या दोघांशिवाय टॉप, मिडल आणि लोअर ऑर्डरमधील कुणालाच विशेष काही करता आलं नाही. तिघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. जो रुट 2, बेन स्टोक्स 5 आणि डेव्हिड मलान 6 धावांवर आऊट झाले. तर हॅरी ब्रूक 17, जॉस बटलर 15 आणि याने डेव्हिड व्हिली 12 धावांचं योगदान दिलं. तर जॉनी बेयरस्टो आणि आदिल रशिद या दोघांनी प्रत्येकी 10 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकाकडून गेराल्ड कोएत्झी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लुंगी एन्गिडी आणि मार्को जान्सेन या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कगिसो रबाडा आणि केशव महाराज या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.