
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. इंग्लंडने टी 20i मालिकेतही आपली परंपरा कायम ठेवली याहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर जोस बटलर याच्यावर विकेटकीपर आणि ओपनिंग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. सलामीच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळालीय? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंड संघात स्टार ऑलराउंडर सॅम करन याचं कमबॅक झालं आहे. सॅमचं अनेक महिन्यानंतर टी 20i संघात पुनरागमन झालं आहे. सॅमला अखेरीस नोव्हेंबर 2024 मधील विंडीज दौऱ्यासाठी टी 20i संघात स्थान मिळालं होतं. सॅमने नुकत्याच झालेल्या टी 20 ब्लास्ट आणि द हन्ड्रेड या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. सॅमने 603 धावा करण्यासह 33 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला सॅमकडून अशाच अष्टपैलू कामगिरी अपेक्षा असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला वनडे सीरिजमधील पहिल्या 2 सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे इंग्लंडचा टी 20i मालिकेत विजय मिळवून वनडे सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न असणार आहे. आता इंग्लंडला यात किती यश येईल? हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.
पहिला सामना, 10 सप्टेंबर, सोफीया गार्डन्स, कार्डीफ
दुसरा सामना, 12 सप्टेंबर, एमीरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
तिसरा सामना, 14 सप्टेंबर, ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम
दरम्यान इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 26 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. एका सामन्याचा अपवाद वगळता दोन्ही संघ तोडीसतोड असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. दक्षिण आफ्रिकेने 26 पैकी 13 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 12 सामन्यात पलटवार केला आहे. तर एका सामन्याचा निकाला लागू शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिल सॉल्ट, जोस बटलर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, टॉम बेंटन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर आणि आदिल राशिद