इंग्लंडचा कॅप्टन Eoin Morgan आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

| Updated on: Jun 28, 2022 | 7:25 PM

इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन ईऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

इंग्लंडचा कॅप्टन Eoin Morgan आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
Eoin morgan
Follow us on

मुंबई: इंग्लंडच्या वनडे आणि टी 20 टीमचा कॅप्टन (England odi captain) ईऑन मॉर्गनने (eoin morgan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडने 2019 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला. (Cricket World cup) त्या टीमचं नेतृत्व ईऑन मॉर्गनने केलं. फक्त यशस्वी कॅप्टनच नव्हे, तर तो यशस्वी फलंदाजही होता. कालच मॉर्गन निवृत्त होणार, अशी ब्रिटीश माध्यमांमध्ये चर्चा होती. आज 28 जूनला इंग्लंडच्या या दिग्गजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मॉर्गनचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता तसेच तो दुखापतीशीही त्याची झुंज सुरु होती. त्यामुळे तो राजीनामा देईल, अशी शक्यता होती. स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळणं तो सुरुच ठेवणार आहे. हंड्रेड स्पर्धेत तो लंडन स्पिरिट या संघाचं नेतृत्वही करणार आहे. स्काय स्पोर्ट्सवर तो कॉमेंटेटरच्या नव्या रोलमध्येही दिसणार आहे.

वनडे मध्ये मॉर्गनच इंग्लंडचा खरा हिरो, कारण…

एलिस्टर कुकच्या जागी 2015 मध्ये ईऑन मॉर्गनची कॅप्टनशिपपदी नियुक्ती करण्यात आली होती. 126 वनडे आणि 72 टी 20 सामन्यामध्ये त्याने इंग्लंडच नेतृत्व केलं. त्याच्याच नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ 2016 टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचला. 2019 मध्ये मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. इंग्रजांकडे क्रिकेटचे जनक म्हणून पाहिलं जातं. इंग्लंडमधूनच क्रिकेटची सुरुवात झाली. पण इंग्लंडलाच क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकता येत नव्हता. वारंवार विश्वचषक त्यांना हुलकावणी देत होते. अखेर मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने पहिल्या वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न साकार केलं.

आयर्लंडच्या संघामधून करीयरला सुरुवात

मॉर्गनने 2006 साली आयर्लंडच्या क्रिकेट संघाकडून आपल्या आंतरराष्ट्रीय करीयरची सुरुवात केली होती. 2009 मध्ये चांगल्या संधी मिळतील, म्हणून तो इंग्लंडमध्ये आला, तेव्हापासूनच तो इंग्लिश संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. “मी, जे काही मिळवलं, त्याचा मला अभिमान आहे. पण काही चांगल्या लोकांसोबत मी जे क्षण व्यतीत केले, त्याचा मला जास्त आनंद आहे” असं मॉर्गनने निवृत्तीच्या संदेशात म्हटलं आहे.

वनडे आणि टी 20 मध्ये किती धाव केल्या?

ईऑन मॉर्गन आपल्या 16 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय करीयरमध्ये एकूण 248 वनडे सामने खेळला. यात 23 आयर्लंड आणि 225 इंग्लंडसाठी आहेत. त्याने एकूण 7701 धावा केल्या. यात 14 शतकं आणि 47 अर्धशतकं आहेत. त्याशिवाय 115 टी 20 सामन्यात 2458 धावा केल्या. इंग्लंडसाठी 200 वनडे सामना खेळणारा तो एकमेव खेळाडू आहे. इंग्लंडसाठी वनडे आणि टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. तो 16 कसोटी सामने सुद्धा खेळला. त्यात त्याने दोन शतकांसह एकूण 700 धावा केल्या.