ENG vs SA : इंग्लंडने वनडे मालिका गमावली, पण तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला अक्षरश: ठेचलं

इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच पार पडली. सुरुवातीचे दोन सामने जिंकून दक्षिण अफ्रिकेने मालिका खिशात घातली होती. पण तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने वचपा काढला आणि दक्षिण अफ्रिकेचा दारूण पराभव केला.

ENG vs SA : इंग्लंडने वनडे मालिका गमावली, पण तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला अक्षरश: ठेचलं
ENG vs SA : इंग्लंडने वनडे मालिका गमावली, पण तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला अक्षरश: ठेचलं
Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 07, 2025 | 10:08 PM

तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडने दक्षिण अफ्रिकेचा धुव्वा उडवला. मालिका गमवली असली तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर सर्व राग काढला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र या सामन्यात सर्व फासे उलट पडले. कारण पहिल्या दोन सामन्यात धावांचा पाठलाग करणं शक्य झालं. मात्र तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने धावांचा डोंगर रचला. त्यामुळे या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकन 100 धावांचा आताच तंबूत परतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 5 गडी गमवून 414 धावा केल्या. तसेच विजयासाठी 415 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण अफ्रिकेचा संघ 20.5 षटकात फक्त 72 धावा करू शकला. हा सामना इंग्लंडने 342 धावांनी जिंकला. एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धावांनी हा सर्वात मोठा पराभव आहे. दक्षिण आफ्रिकेचा याआधीचा सर्वात मोठा एकदिवसीय पराभव गेल्या महिन्यात मॅके येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 276 धावांनी झाला होता. इंग्लंडचा याआधीचा सर्वात मोठा एकदिवसीय विजय 2018 मध्ये ट्रेंट ब्रिज येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 242 धावांनी होता.

इंग्लंडने 414 धावा केल्या यात जो रूटने 96 चेंडूत 100 आणि जेकब बेथेलने 82 चेंडूत 110 धावांचं योगदान राहिलं. तर जेमी स्मिथने 62 आणि जोस बटलरने नाबाद 62 धावांची खेळी केली. इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू हजेरी लावून परतत होते. धडाधड विकेट पडत होत्या. त्यामुळे पहिल्या 15 षटकातच दक्षिण अफ्रिकेचा पराभव निश्चित झाला होता. एडन मार्करम आणि वियान मुल्डर यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. तर रायन रिकल्टन 1, मॅथ्यू ब्रीट्झ 4, ट्रिस्टन स्टब्स 10, डेवॉल्ड ब्रेविस 6, केशव महाराज 17, कोडी युसूफ 5 धावा करून तंबूत परतले. जोफ्रा आर्चरने या सामन्यात भेदक गोलंदाजी केली.

जो रूटने या विजयानंतर सांगितलं की, ‘या खेळपट्टीवर दोन भागीदारी करणे ही गुरुकिल्ली होती. बॅकएंडवर आलेल्या खेळाडूंनीही चांगली फलंदाजी केली. जेकब बेथल काय करत आहे हे अगदी बरोबर माहित होते, तो त्याच्या वयापेक्षाही हुशार आहे, तो ८ वर्षांचा असल्यापासून मी त्याला खूप काळापासून ओळखतो. आशा आहे की, तो एका ताकदीपासून दुसऱ्या ताकदीपर्यंत जाऊ शकेल आणि इंग्लंडसाठी अधिक सामना जिंकणारे डाव खेळू शकेल. तुमच्या खेळाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचे मार्ग शोधणे महत्वाचे आहे, तुम्ही जितके जास्त खेळाल तितके तुम्ही चांगले व्हाल.’