17 सिक्स, 35 बॉलमध्ये 118 रन, 19 वर्षांच्या युवा बॅट्समनकडून ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक

Chris Gayle Fastest Record Break | ख्रिस गेल याने आयपीएल 2013 मध्ये पुणे विरुद्ध 30 बॉलमध्ये शतक ठोकण्याचा कारनामा केला होता.

17 सिक्स, 35 बॉलमध्ये 118 रन, 19 वर्षांच्या युवा बॅट्समनकडून ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक
| Updated on: Aug 10, 2023 | 10:51 PM

मुंबई | आतापर्यंत वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ख्रिस गेल याने अनेकदा वादळी खेळी केलीय. तसेच गेलने लीग क्रिकेटमध्ये आपल्या बॅटिंगने तडाखा दाखवून दिलाय. गेलने आपल्या झंझावाती खेळीच्या जोरावर असंख्य रेकॉर्ड्स केले आहेत. गेलने आयपीएलमध्ये 10 वर्षांपूर्वी असाच एक अफलातून रेकॉर्ड केला होता. ख्रिस गेल याने अवघ्या 30 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. गेलचा हा विक्रम गेली अनेक वर्ष कायम होता. मात्र अनेक वर्षांनंतर ख्रिस गेल याचा हा रेकॉर्ड अखेर ब्रेक झाला आहे. रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या फलंदाजाचं नावही कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल.

ख्रिस गेल याचा विक्रम 19 वर्षांच्या आरिफ सांगर या युवा फलंदाजाने ब्रेक केला आहे. अफगाणिस्तान क्रिकेटने गेल्या काही वर्षात तोडीसतोड खेळाडू दिले आहेत. या यादीत राशिद खान, मोहम्मद नही, रहमानुल्लाह गुरबाज, मुजीब उर रहमान यासारख्या अनेकांचा समावेश आहे. आता त्या यादीत आरिफ याचं नाव जोडलं गेलंय. आरिफने फटकेबाजी करत आपल्यात खेळण्याची क्षमता आहे, हे सिद्ध करुन दाखवलंय.

फक्त 29 बॉलमध्ये काम तमाम

आरिफने टॉप गिअर टाकत धमाका केला. आरिफने युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये ही कामगिरी केली. आरिफने स्पिनर-फास्टर न पाहता येईल तो बॉल फटकावला. आरिफने पख्तून जाल्मी टीमकडून खेळताना फक्त 29 चेंडूत शतक ठोकलं. आरिफने एकूण 35 बॉलमध्ये 118 रन्स केल्या. आरिफच्या या खेळीच्या जोरावर पख्तूनने पावर सीसी विरुद्ध 3 विकेट्स गमावून 185 धावांपर्यंत मजल मारली. या 186 धावांचा पाठलाग करताना पावर सीसी टीमचा 103 धावांवर गेम ओव्हर झाला.

आरिफ सांगर याची विस्फोटक खेळी

ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक

आरिफने या खेळीदरम्यान एकाच ओव्हरमध्ये 29 धावा ठोकल्या. आरिफने यासह ख्रिस गेल याचा 10 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला. ख्रिस गेल याने 2013 साली आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना सहारा पुणे वॉरियर्स विरुद्ध 30 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.