
Sheffield Shield: ऑस्ट्रेलियात देशांतर्गत शेफील्ड शील्ड स्पर्धा सुरू आहे. ही ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी स्पर्धा असून भविष्यातील खेळाडूंचा वेध घेतला जातो. त्यामुळे या स्पर्धेत कोण कसं खेळतं याकडे लक्ष असतं. शेफील्ड शील्ड 2025-26 स्पर्धेच्या 30 व्या सामन्यात तस्मानिया आणि क्वींसलँड संघ आमनेसामने आले होते. हा सामना होबार्टच्या बेलराइव्ह ओव्हल स्टेडियममध्ये सुरू होता. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक आश्चर्यकारक घटना घडली. त्यामुळे मैदानात धावाधाव झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्याची वेळ आहे. तस्मानियाच्या दुसऱ्या डावादरम्यान हा प्रकार घडला. त्यामुळे सामनाि 25 मिनिटे थांबवला गेला. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्टेडियममध्ये अचानक फायर अलार्म वाजला. त्यामुळे मैदानात उपस्थित असलेला प्रत्येक जण घाबरला. स्टेडियममध्ये आग लागल्याची धास्ती खेळाडू आणि प्रेक्षकांना वाटू लागली.
अग्निशमन दलाचे जवान या घटनेची माहिती मिळताच स्टेडियममध्ये आले. जवानांनी रिकी पाँटिंग स्टँडची तपासणी करत होते. तर खेळाडू पुन्हा कधी सामना सुरू होणार याची वाट पाहात होते. 25 मिनिटांची तपासणी झाल्यानंतर सामना पुन्हा सुरू केला गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात क्वींसलँडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तस्मानियाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. तस्मानियाचा संघ 198 धावा करून बाद झाला. यात मायकल नेसरने 5 विकेट घेतल्या. तर क्वींसलँडने पहिल्या डावात 178 धावा करू शकला. लॉरेंस नील-स्मिथने 4 विकेट आणि मॅथ्यू कुनेमॅनने 3 विकेट घेतल्या. त्यामुळे तस्मानियाला 20 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात या 20 धावांच्या आघाडीसह पुढे खेळताना 348 धावा केल्या. यात जॉर्डन सिल्कने 82, जेक डोरने 76, मॅथ्यू कुनेमॅनने 56 आणि जेक वेदराल्डने 62 धावा केल्या. तस्मानियाने क्वींसलँडसमोर 362 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
तिसऱ्या दिवसांचा खेळ संपला तेव्हा क्वींसलँडने 1 गडी गमवून 20 धावा केल्या आहेत. अजूनही क्वींसलँडचा संघ 342 धावांनी पिछाडीवर आहे. आता चौथ्या दिवशी काय होतं याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.