गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनताच खेळाडूंना दिला थेट इशारा, असं असेल तर…

राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली आहे. यावेळी गौतम गंभीरच्या मुळ स्वभावाची प्रचिती येण्यास सुरुवात झाली आहे. रोखठोख भूमिकेसाठी प्रचलित असलेल्या गौतम गंभीरने तिन्ही फॉर्मेटबाबत खेळाडूंना थेट इशारा दिला आहे.

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनताच खेळाडूंना दिला थेट इशारा, असं असेल तर...
| Updated on: Jul 12, 2024 | 8:27 PM

गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. गौतम गंभीर 2027 पर्यंत टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी असणार आहे. यात पाच आयसीसी स्पर्धांना सामोरं जावं लागणार आहे. दुसरीकडे, गौतम गंभीरसोबत कोचिंग स्टाफमध्ये कोण असेल? याबाबत खलबतं सुरु आहेत. असं असताना गौतम गंभीरने खेळाडूंना थेट इशारा दिला आहे. स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत गौतम गंभीरचा आक्रमक अंदाज पाहायला मिळत आहे. प्रशिक्षकपदी रूजू झाल्यानंतर गौतम गंभीरने आपला पहिला संदेश खेळाडूंना दिला आहे. या माध्यमातून गौतम गंभीरने आपला हेतू स्पष्ट केला आहे. गौतम गंभीरने सांगितलं की, ‘दुखापतग्रस्त होणं हा खेळाडूंच्या जीवनाचा एक भाग आहे. जर तिन्ही फॉर्मेट खेळत असाल आणि जखमी झाला तर पुन्हा रिकव्हर व्हा. पण तु्म्हाला तिन्ही फॉर्मेट खेळायला हवेत.’

“मी लोकांना असं सांगण्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही की, ठीक आहे आम्ही त्याला कसोटी सामन्यांसाठी ठेवू किंवा आम्ही इतर फॉर्मेटसाठी ठेवू आणि आम्ही त्याची दुखापत आणि कार्यभार याची व्यवस्था करू. प्रोफेशनल क्रिकेटपटूंकडे खूप कमी वेळ असतो. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता.तेव्हा जितकं शक्य होईल तितकं खेळू इच्छिता. जेव्हा तुम्ही चांगल्या फॉर्मात असता तेव्हा पुढे या आणि तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळा.”, असं गौतम गंभीर याने सांगितलं.

“माझा फक्त एकच संदेश आहे की, प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न करा. जितकं शक्य आहे तितकं आपल्या खेळाप्रती प्रामाणिक राहा आणि त्याचे चांगले परिणाम दिसतील. जेव्हा मी बॅट उचलली तेव्हा काय होईल याचा विचार केला नव्हता.मी कधीच विचार केला नव्हता की असं काही करेन. मी इतक्या धावा करू इच्छितो. माझं एकच म्हणणं आहे की, मी माझ्या कामाप्रती जितकं शक्य तितकं प्रामाणिक राहीन. काही सिद्धांतावर जगा, काही मूल्य पाळा, योग्य ते करण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करा की गोष्टी व्यवस्थित होतील. मग तुमच्या विरोधात संपूर्ण जगआहे असं वाटत असलं तरी संघाच्या हितासाठी काम करत राहा.”, असं गौतम गंभीर पुढे म्हणाला.

“मी क्रिकेटच्या मैदानात आक्रमक राहिलो आहे. लोकांशी भांडणंही झाली. पण जे काही केलं ते संघाच्या हितसाठी होतं. असा प्रयत्न व्हायला हवा की त्यात संघाचं हित असावं. कारण टीमचं महत्त्व अधिक आहे. हे काय एका व्यक्तीसाठी नाही. मैदानावर जा आणि फक्त एकाच गोष्टीचा विचार केला की तुम्ही संघासाठी खेळत आहात. संघाला जिंकवण्याचा प्रयत्न करा. संघासाठी अशाच खेळीची अपेक्षा आहे. क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाही जिथे तुम्ही स्वत:बाबत विचार कराल. हा एक सांघिक खेळ आहे आणि इथे संघ प्रथम येतो. या रांगेत तुम्ही सर्वात शेवटी आहात.’, असं गौतम गंभीरने सांगितलं.