
टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वात म्हणजे 2025-2027 या वर्षासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआने वेळापत्रक जाहीर केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला की पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना 20 जूनला लीड्सवर आणि याच मैदानावर 31 जुलैला शेवटचा कसोटी सामना होणार आहे. दरम्यान, बर्मिंघम, लॉर्ड्स, मॅन्चेस्टर मैदानात इतर कसोटी सामने होतील. या कसोटी मालिकेवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाचं गणित ठरणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला यश मिळालं तर पुन्हा एकदा अंतिम फेरीच्या आशा वाढतील. पण हा दौरा भारतीय संघासाठी अग्निपरीक्षा असणार आहे. कारण भारताने गेल्या 17 वर्षात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही.
भारताने इंग्लंडमध्ये 2007 मध्ये कसोटी मालिका जिंकली होती. मागच्या दौऱ्यावेळी टीम इंडिया विजयाच्या जवळ आली होती. 2021-22 मध्ये इंग्लंड दौऱ्यात मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने आघाडीवर होता. पण कोविड काळात एक सामना होण्यास दिरंगाई झाली. शेवटच्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आणि मालिका बरोबरीत सोडवली.इतकंच काय इंग्लंडच्या भूमीवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दोन्ही अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीरची कसोटी लागणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया पाच टी20 आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचं टीम इंडियाचं वेळापत्रक आतापासून व्यस्त असल्याचं दिसत आहे.
दुसरीकडे, भारत इंग्लंड महिला संघाची टी20 मालिका 28 जून ते 12 जुलैपर्यंत चालेल. तर वनडे मालिका 16, 19 आणि 22 जुलैला असेल. पहिला टी20 सामना 28 जून नॉटिंघम, दुसरा टी20 सामना ब्रिस्टॉल 1 जुलै, तिसरा टी20 सामना लंडन 4 जुलै, चौथा टी20 सामना 9 जुलै मॅन्चेस्टर आणि पाचवा टी20 सामना बर्मिंघमध्ये 12 जुलैला होईल. तर पहिला वनडे सामना 16 जुलैला साउथँप्टन, दुसरा वनडे सामना लॉर्ड्स 19 जुलै आणि तिसरा वनडे सामना 22 जुलै चेस्ट ली स्ट्रीट येथे होईल.