GT vs RR : गुजरातचा विजयी चौकार, राजस्थानचा 58 धावांनी धुव्वा, Prasidh Krishna चमकला

Gujarat Titans vs Rajasthan Royals Match Result : गुजरात टायटन्सने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्सचा 58 धावांनी धुव्वा उडवत सलग चौथा विजय मिळवला आहे.

GT vs RR : गुजरातचा विजयी चौकार, राजस्थानचा 58 धावांनी धुव्वा, Prasidh Krishna चमकला
Prasidh Krishna GT vs RR Ipl 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 10, 2025 | 12:32 AM

गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात पाहुण्या राजस्थान रॉयल्सवर 58 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गुजरातने घरच्या मैदानात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राजस्थानला विजयासाठी 218 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानला धड 20 ओव्हरही खेळता आलं नाही. गुजरातने राजस्थानला 19.2 ओव्हरमध्ये 159 धावांवर ऑलआऊट केलं. राजस्थानचा हा या मोसमातील सलग 2 विजयानंतरचा पहिला आणि एकूण तिसरा पराभव ठरला. तर गुजरातने विजयी चौकार लगावला.

गुजरातसमोर राजस्थान ढेर

राजस्थानकडून फक्त तिघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतरांनी गुजरातच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला. राजस्थानसाठी शिमरॉन हेटमायर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शिमरॉनने 32 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फरोसह 52 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसन याने 41 धावांची खेळी केली. तर रियान पराग याने 26 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. गुजरातकडून प्रसिध कृष्णा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर राशिद खान आणि आर साई किशोर या जोडीने प्रत्येकी दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर कुलवंत खेजरोलिया, अर्शद खान आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान गुजरातने त्याआधी टॉस गमावून 6 बाद 217 धावा केल्या. साई सुदर्शन याने सर्वाधिक 82 धावांची खेळी केली. तर जोस बटलर आणि शाहरुख खान या दोघांनी प्रत्येकी 36-36 धावा केल्या. राशिद खान याने 12 धावा जोडल्या. तर राहुल तेवतियाने 24 धावांची नाबाद खेळी साकारली, ज्यामुळे गुजरातला 200 पार पोहचता आलं. राजस्थानचे गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरले. तुषार देशपांडे आणि महीश तीक्षणा या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या मात्र 50 पेक्षा अधिक धावा दिल्या. तर जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

गुजरातचा विजयी चौकार

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि इशांत शर्मा.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे.